Join us

बालगृहांना जास्तीतजास्त निधी देणार

By admin | Updated: February 5, 2015 00:52 IST

राज्यातील बालगृहांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी लवकरच वित्तमंत्र्यांची भेट घेण्यात येईल.

मुंबई : राज्यातील बालगृहांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी लवकरच वित्तमंत्र्यांची भेट घेण्यात येईल. राज्यातील बालगृहांच्या आधुनिकीकरणासाठी शासन प्रयत्नशील असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बालगृहांत सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यास प्राधान्य देणार असल्याचे महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी सांगितले.चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या मानखुर्द येथील बालगृहास ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी माधव भंडारी, महिला व बाल विकास विभागाचे सहायक आयुक्त जे.बी. गिरासे, बालगृहाचे अधीक्षक के.बी. गायकवाड उपस्थित होते. ‘लोकमत’ने राज्यभरातील बालगृहे अनुदानापासून उपेक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव उघड केले. या बालगृहांना लवकरात लवकर अनुदान मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ सातत्याने पाठपुरावाही करत आहे. या सुधारगृहातील मुलांच्या कल्याणासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल, असे ठाकूर म्हणाल्या. या वेळी त्यांनी मतिमंद मुलांच्या वसतिगृहास भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या बालगृहातील वसतिगृह, वैद्यकीय सुविधा, कार्यशाळा तसेच इतर उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.