Join us  

अभिमानास्पद... मुंबईतील शिवाजी पार्कच नामांतर, आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क'

By महेश गलांडे | Published: November 14, 2020 2:52 PM

मुंबईत शिवाजी पार्कवर अनेकांच्या आठवणी आहेत, अगदी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या मैदानावर बालपणी फटकेबाजी केलीय. १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभा होतात

ठळक मुद्देमुंबईत शिवाजी पार्कवर अनेकांच्या आठवणी आहेत, अगदी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या मैदानावर बालपणी फटकेबाजी केलीय. १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभा होतात

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंच्या गर्जनेनं दणाणून जाणाऱ्या शिवाजी पार्कचं नाव बदलण्यात आलं आहे. ठाकरे सरकारने या पार्कचे नामांतर केले असून शिवाजी पार्क आता, छत्रपती शिवाजी महाराज पार्क या नावाने ओळखले जाईल. अलीकडेच महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. या मैदानाच्या नामांतराचा प्रस्ताव मार्च महिन्यात पालिका सभागृहात मांडण्यात आला होता. यापूर्वी मुंबईतील सर्वात मोठं टर्मिनस असलेल्या सीएसटीचंही असंच नाव बदलण्यात आलं होतं. 

मुंबईत शिवाजी पार्कवर अनेक दिग्गजांच्या आठवणी आहेत, अगदी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या मैदानावर बालपणी फटकेबाजी केलीय. १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभा होतात. सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचेही आयोजनही या मैदानात होते. या मैदानाला 10 मे 1927 रोजी शिवाजी पार्क असे नाव देण्याचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यामुळं तब्बल 73 वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचे नाव बदलण्यात आलं आहे. शिवाजी पार्कचे पहिले नाव माहिम पार्क असं होतं. 

मुंबई महापालिकेने 10 मे 1927 रोजी मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्याचा ठराव पालिका सभागृहात मंजूर केला होता. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यामुळे मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामकरण करण्यासाठी शिवसेनेने पालिकेकडे पाठपुरावा केला. यापूर्वी मुंबईतील सीएसटी म्हणजेच छत्रपती शिवाजी टर्मिनस असं नाव असलेल्या मुंबईतील सर्वात मोठ्या टर्मिनसचेही नाव बदलण्यात आले होते. त्यामुळेच, आता सीएसटीचे नाव सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता, शिवाजी पार्कचेही नामकरण झाले असून ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं असणार आहे.  

टॅग्स :मुंबईदादर स्थानकछत्रपती शिवाजी महाराज