Join us  

'मांसाहार करणाऱ्यांनो, लाज बाळगा'; कांदिवलीत मांसाहाराविरोधात मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 2:44 PM

अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानातील अंड्याचे क्रेटस आतमध्ये आणून ठेवले .

मुंबई: कांदिवली परिसरात रविवारी एका धर्मगुरूच्या समर्थकांनी मांसाहाराविरोधात मोर्चा काढला होता. येथील ठाकूर व्हिलेज कॉलनीच्या परिसरात काढण्यात आलेल्या या मोर्चा शेकडो जण सहभागी झाले होते. यावेळी मोर्चात 'मांसाहार करणाऱ्यांनो, लाज बाळगा', अशी घोषणाबाजीही करण्यात आली. या मोर्चात सहभागी झालेले लोक मेरठमधील बाबा जयगुरुदेव महाराज यांचे अनुयायी आहेत. यापूर्वीही आम्ही शाकाराच्या प्रचारासाठी अशाप्रकारचे मोर्चे काढल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चादरम्यान त्यांनी ध्वनिक्षेपकावरून 'मांसाहार करणे पाप आहे, त्यामुळे मानवता नष्ट होत असून विनाशाकडे जाल', अशा घोषणा दिल्या. आमच्या संघटनेचे महाराष्ट्रातच १० हजारांहून अधिक लोक आहेत. लोकांनी मांसाहार आणि दारू पिणे सोडून द्यावे, असा आमचा या रॅली काढण्याचा हेतू आहे, असे सुशील सिंह यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे हा मोर्चा रस्त्यावरून जात असताना अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानातील अंड्याचे क्रेटस आतमध्ये आणून ठेवले . याशिवाय, या परिसरातील मासळी विक्रेत्यांनी आपल्या जागा बदलल्या होत्या. सध्याच्या काळात तुम्ही एखाद्या जमावाच्या रोषाला कसे बळी पडाल, याचा काही नेम नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याविषयी मौन बाळगणेच पसंत केले. दरम्यान, सुशील सिंह यांनी आपले कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ईच्छेनुसार जगण्याचा हक्क दिला आहे, याकडे प्रसारमाध्यमांनी त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुशील कुमार सिंह यांनी म्हटले की, एखाद्याने अन्य कोणत्या जीवाला हानी पोहोचवल्यास त्यांचा विनाश अटळ आहे आणि हेच सत्य आहे. पाश्चात्य लोकही शाकाहाराला पसंती देत आहेत,' असेही त्यांनी सांगितले. आम्ही खूपच शांततेने रॅली काढून जनावरांची कत्तल करू नका, तसेच त्यांना कोणताही त्रास देऊ नका, असे आवाहनही सुशील सिंह यांनी लोकांना केले. 

टॅग्स :अन्नमुंबई