ठाणे : गेल्या काही महासभांमध्ये झालेल्या गोंधळात बऱ्याच वेळा महापौरांना डायसवर घेराव घालण्यात आला होता. तर, तीन ते चार वेळा सचिवांनादेखील धक्काबुक्की झाली होती. परंतु, यापुढे असा प्रकार घडल्यास महापौरांना सुरक्षाकवच मिळावे, म्हणून पावले उचलण्यात आली आहेत. त्यांच्या डायसची उंची दोन फुटांनी वाढविण्यात येत आहे. तसेच काचही बसविली जाणार आहे. त्यामुळे, आता विरोधक अथवा सत्ताधाऱ्यांचे पीठासीन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न फोल ठरणार आहेत. या महिन्यात होणारी महासभा ही याच सुरक्षाकवचात होणार आहे. २०१२मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. विरोधक नेहमीच महापौरांना टार्गेट करतात. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत तर काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक महापौरांवर धावून गेले होते. या राड्यात सत्ताधारी सचिवांकडून अजेंडा उरकून घेतात. एकदा सचिवांच्या अंगावर पाणी ओतण्याचा व धक्काबुक्की करून त्यांची कॉलर पकडण्याचा प्रकारही विरोधकांकडून झाला होता. याच गोंधळात डायसवरील माइक पकडणे, सचिवांना धक्काबुक्की करणे आणि वारंवार महापौरांवर आक्षेप घेत महासभा उधळून लावणे, असे प्रकार मागील ३ वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे आता डायसची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापौरांच्या डायसला सुरक्षाकवच
By admin | Updated: October 9, 2015 00:40 IST