मुंबई : केईएम रुग्णालयातील निवासी पुरुष डॉक्टरांसाठी असलेल्या वसतिगृहाला अडीच महिन्यांपासून सुरक्षारक्षक नव्हता. मंगळवारपासून या वसतिगृहाचे लोखंडी दार बंद करण्यात आले असून, येथे एक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला आहे. निवासी पुरुष डॉक्टरांच्या वसतिगृहाला सुरक्षारक्षक नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाइक वसतिगृहामध्ये येत-जात असत. तळमजल्यावरील प्रसाधनगृहही रुग्णांचे नातेवाईक वापरत असत. यामुळे येथील निवासी डॉक्टर त्रस्त झाले होते. हे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पावले उचलली. जुन्या वसतिगृहामध्ये सुरक्षारक्षकाची एक जागा होती. त्याला बसण्यासाठी टेबल ठेवण्यात आले होते. मात्र तिथे सुरक्षारक्षक नसायचा. केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीला लागूनच हे वसतिगृह आहे. यामुळेच रुग्णांचे नातेवाइक या वसतिगृहात सहज ये - जा करायचे. वसतिगृहाच्या तळमजल्यावरील प्रसाधनगृहही रुग्णांचे नातेवाइक वापरायचे. वसतिगृहाला एक लोखंडी गेट होते, मात्र दिवसभर ते गेट उघडे असायचे. आता हे गेटदेखील बंद करून घेण्यात आले आहे. येथे एका सुरक्षारक्षकाला तैनात करण्यात आले आहे. या वसतिगृहामध्ये ७७ खोल्या असून, १५४ निवासी डॉक्टर येथे राहतात. (प्रतिनिधी)
जुन्या वसतिगृहाला मिळाला सुरक्षारक्षक
By admin | Updated: May 21, 2014 04:25 IST