Join us

२६ अग्निशमन केंद्रांचा प्रस्ताव

By admin | Updated: April 17, 2015 00:17 IST

अग्निशमन दलाला सक्षम करण्यासाठी आगीला प्रतिबंध ही बाब प्राधान्य क्रमावर ठेवून त्यावर संशोधन करून उपाययोजना सुचविण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.

मुंबई : अग्निशमन दलाला सक्षम करण्यासाठी आगीला प्रतिबंध ही बाब प्राधान्य क्रमावर ठेवून त्यावर संशोधन करून उपाययोजना सुचविण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. नवीन २६ अग्निशमन केंदे्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे, ८१ व ९० मीटर उंचीची शिडीही विकत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिली.अग्निशमन सेवा बजावताना वीरगती प्राप्त जवानांच्या कार्याचे यथोचित व प्रेरणादायी स्मरण करून श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या केंद्र्रातील प्रांगणात मंगळवारी पार पडला, त्यावेळी सीताराम कुंटे बोलत होते. ते म्हणाले, मुळातच अग्निशमन हे एक आव्हानात्मक काम आहे. त्यातच मुंबई हे नेहमी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेले शहर आहे. मुंबईतील उंच इमारतींची वाढती संख्या, काचेच्या इमारती, झोपडपट्टींमध्ये अरुंद जागांमधून वाट काढत घटनास्थळी पोहोचण्याची कसरत अशा एक ना अनेक किचकट आव्हानांचा सामना आग विझवताना करावा लागतो. अशी आव्हाने पेलण्यास मुंबई अग्निशमन दल सक्षम आणि समर्थ आहे. अग्निशमन दलाच्या सामर्थ्यांत वाढ होण्यासाठी, जागतिक दर्जाची अग्निशमन सेवा देता यावी याकरिता महापालिका भविष्याचे अग्निशमन धोरण ठरवित आहे. झोपडपट्ट्यांमध्ये आत पोहोचता यावे यासाठी लहान आकाराची अग्निशमन वाहने व साहित्य उपलब्ध करण्याचे नियोजन असून, अग्निशमन कार्यात सामाजिक संवाद व सहभाग वाढविण्याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे. महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात भीषण अग्निकल्लोळाशी झुंज देताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवानांनी प्राणाहुती दिल्या. त्यानंतरही विविध दुर्घटना व आपत्ती यांच्याशी सामना करताना अग्निशमन जवानांनी प्राणाहुती दिली. (प्रतिनिधी)च्नवीन २६ अग्निशमन केंदे्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. ८१ व ९० मीटर उंचीची शिडीही विकत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.च्पालिका भविष्याचे अग्निशमन धोरण ठरवित आहे.