कल्याण : शासनाचे धोरण आणि व्यापाऱ्यांचे असहकार्य याचा फटका एलबीटीच्या (स्थानिक संस्था कर) वसुलीला बसला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५ कोटी ९० लाखांनी उत्पन्न घटले आहे. केडीएमसी एलबीटीत गडबडली असली तरी मालमत्ताकराद्वारे मात्र २५९ कोटी ६१ लाखांची वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे.एलबीटी वसुलीचा आढावा घेता गेल्या वर्षी एकूण १९२ कोटी ३१ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यात निव्वळ एलबीटीचे उत्पन्न १४२ कोटी होते. सन २०१४-१५ साठी महापालिकेच्या महासभेने २७१ कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, शासनाने आॅगस्ट २०१४ पासून पारगमन शुल्क बंद केले. यामुळे ७ कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. त्यातच शासनाची एलबीटीसंदर्भात ठरत नसलेली भूमिका, परिणामी व्यापाऱ्यांनी कर भरण्यास दिलेला नकार उत्पन्न घटण्यास कारणीभूत ठरला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २०५ कोटींचे उद्दिष्ट ठरविल्यानंतरही ३१ मार्च अखेरपर्यंत केडीएमसीला १८० कोटी २२ लाख इतकीच वसुली करता आली आहे. पारगमन शुल्क, मुद्रांक शुल्क आणि एलबीटी असे मिळून ही वसुली झाली आहे. पाणीबिलातही समाधानकारक वसुली झालेली नाही. यंदा ५४ कोटींचे उद्दिष्ट असताना ४७ कोटी ८० लाखांची वसुली करता आली आहे. (प्रतिनिधी)
मालमत्ता करवसुलीत केडीएमसीची आघाडी
By admin | Updated: April 2, 2015 00:21 IST