Join us

याकूबच्या फाशीमुळे पाकिस्तानला योग्य संदेश - संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2015 13:30 IST

मुंबईतील १९९३च्या बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्यामुळे पाकिस्तानमधून सुरु असलेल्या दहशतवादाविरोधात योग्य संदेश देण्यात आला आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मुंबईतील १९९३ साली झालेल्या बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्यामुळे पाकिस्तानमधून सुरु असलेल्या दहशतवादाविरोधात योग्य संदेश देण्यात आला आहे, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. 
'भारतात अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले खपवून घेतले जाणार नाही, हे याकूबच्या फाशीमुळे सिद्ध झाले आहे. याकूबने देशातील निरपराधांचा बळी घेतला, त्यांनाही आज ख-या अर्थाने न्याय मिळाला' असेही राऊत म्हणाले. 
एकीकडे राऊत यांनी याकूबच्या फाशीबाबत समाधान व्यक्त केलेले असतानाच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मात्र या निर्णयाने आपल्याला दु:ख झाल्याचे म्हटले आहे. ' याकूबने आत्मसमर्पण केले होते. त्याचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास होता, मात्र आज त्याला फासावर लटकवण्यात आले' असे ते म्हणाले.  तसेच १९९९३ साली झालेले स्फोट हे दंगलीनंतरची रिअॅक्शन होती, त्यामुळे रिअॅक्शनला शिक्षा होते, मग ( दंगलीच्या) त्या अॅक्शनला शिक्षा का नाही असा सवालही त्यांनी विचारला.
याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा थांबवण्यासाठी ऐन वेळी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने याकूबची याचिका फेटाळून लावली आणि अखेर आज सकाळी याकूबला फासावर लटकवण्यात आले. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून ते मुंबईला येत आहेत. मुंबईतील चंदनवाडीजवळील कब्रस्तानात याकूबचे दफनविधी होतील.