Join us

प्रचाराची रणधुमाळी टिपेला

By admin | Updated: October 11, 2014 00:14 IST

पालघर जिल्हयातील सहा मतदारसंघामधील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचली आहे

दिपक मोहिते, वसईपालघर जिल्हयातील सहा मतदारसंघामधील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचली आहे. उमेदवारांची माहिती तसेच राजकीय पक्षांचे धोरण अधोरेखित करणारी पत्रके सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. प्रचारही हायटेक पद्धतीने होत असून आकर्षक पत्रके बनवण्यावर प्रत्येक राजकीय पक्षाने भर दिला आहे. केलेली व प्रस्तावित विकासकामे यासंदर्भातील माहिती या सर्व पत्रकामध्ये आहे. मतदारांच्या पावत्या पूर्वी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून वाटप केल्या जात असत. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीपासून या पावत्या निवडणूक यंत्रणेकडूनच पोहोचवण्यात येतात. असे असले तरी काही राजकीय पक्षांनी मात्र स्वत:च्या पावत्या तयार केल्या असून आपल्या कार्यकर्त्यांना पाठवुन मतदारांना देण्यात येत आहेत. उमेदवार कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू पाहत नाहीत हे यावरून सिद्ध होते.गेले १० दिवस सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. यंदा जाहीर सभेवर भर न देता उमेदवारांनी गावागावात लहान लहान सभा घेतल्या. अशा सभांमध्ये थेट मतदारांशी संवाद साधता येत असल्यामुळे चौक व गावसभांना उत आला होता. सायंकाळी मतदार कामावरून परतल्यानंतर ८ ते १० च्या दरम्यान होणाऱ्या अशा लहान सभा राजकीय पक्षांना लाभदायक ठरल्या. प्रचारासाठी परवा सुट्टीच्या दिवशी रॅली तसेच मिरवणूका मोठ्या प्रमाणात काढण्यात येतील. यंदा आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. आचारसंहिता भंगचे प्रमाणही कमी राहीले. प्रचारादरम्यान वीजपुरवठा खंडीत होण्याचे तसेच विजेचे भारनियमन इ. प्रकार घडल्यामुळे त्याचा पुरेपुर फायदा घेण्याचा अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रयत्न केला. वीजपुरवठा सतत खंडीत झाल्याने पाणीपुरवठ्यावरही त्याचा विपरीत परिणाम जाणवला. या सर्व घटनांचा बरावाईट वापर या प्रचारादरम्यान झाला. अनेक उमेदवारांनी या प्रश्नी विद्यमान आमदारांना घेरण्याचे प्रयत्न केले. वसई व नालासोपारा येथे पंचरंगी लढती होत आहेत. वसई येथे हितेंद्र ठाकूर व काँग्रेसचे मायकल फुर्ट्याडो यांच्यात जोरदार लढत होईल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. नालासोपारा येथे विद्यमान आ. क्षितीज ठाकूर व राजन नाईक हे पहिल्या क्रमांकासाठी एकमेकांना झुंज देतील. निवडणुकांपुर्वी महानगर पालिकेत नगरसेवक असलेले राजन नाईक व सेनेचे शिरीष चव्हाण हे जीवश्च कंठश्च मित्र पण युती तुटली व निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले. दुसरीकडे याच मतदारसंघात मनसेने विजय मांडवकर यांना रिंगणात उतरवले आहे. मांडवकर यांच्या उमेदवारीमुळे मतविभागणी होण्याची दाट शक्यता आहे. नालासोपारा व वसई या दोन्ही मतदारसंघात अनेक मतदानकेंद्रे संवेदनशील असल्यामुळे येथे राज्य राखीव पोलीस व पॅरामिलीट्री फोर्स च्या जवानांना तैनात केले आहे. नालासोपारा मतदारसंघाचा पूर्व भाग हा सर्वाधिक संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नालासोपाऱ्यात पोलीस यंत्रणेने प्रचंड फौजफाटा आणला आहे.