Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंगिस्तानचा जाहिरात महोत्सव सुरू

By admin | Updated: February 6, 2015 01:06 IST

यंग इंडियासाठी करिअरच्या वाटा निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या ‘यंगिस्तान’च्या जाहिरात महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली.

मुंबई : यंग इंडियासाठी करिअरच्या वाटा निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या ‘यंगिस्तान’च्या जाहिरात महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयात अमेय मोने, ओंकार राणे आणि निरंजन गोडांबे या तिघा तरुणांनी बीएमएमच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यंगिस्तान अ‍ॅडव्हर्टायझिंग फेस्टिव्हल’ आयोजित केला आहे. ‘यंगिस्तान’ या चळवळीचे ‘लोकमत’ वृत्तपत्र माध्यम प्रायोजक आहेत.महिनाभर चालणाऱ्या या जाहिरात महोत्सवात विद्यार्थ्यांना एलआयसीचे उमेश मिठे, तन्वी हर्बलच्या मेधा मेहेंदळे, ब्युटिकतर्फे बिना व हॉरिझॉन डीएमसीचे मकरंद साठे या वेळी उपस्थित होते. या सर्वांनीच आपापल्या संस्थेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांच्या कामाचे स्वरूप, संस्थेला जाहिरातींमधून होणारा नफा, त्यामुळेच जाहिरातींना प्राप्त झालेले महत्त्वाचे स्थान, जाहिरात माफक शब्दांत ग्राहकांना/ प्रेक्षकांना कशाप्रकारे भावली पाहिजे या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.या वेळी बीएमएमच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ‘या स्पर्धकांना संस्थेसाठी २० सेकंदांची जाहिरात तयार करायची आहे. यासाठी स्पर्धकांचा १० जणांचा एक गट तयार करण्यात आला. दुसरी फेरी १४ फेब्रुवारी रोजी होणार असून १० जाहिरातींची निवड करण्यात येईल. या १० विद्यार्थ्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत कंपनीसाठी टिझर/जाहिरात तयार करण्याची संधी मिळेल. यातील अंतिम ३ विजेत्यांची घोषणा २८ फेब्रुवारी रोजी करण्यात येईल,’ अशी माहिती यंगिस्तान ही चळवळ सुरू करणारा अमेय मोने म्हणाला. विजेत्या विद्यार्थ्यांच्या जाहिराती या संस्थांकडून त्यांच्या बेवसाइटवर, तसेच सोशल नेटवर्किंग साइटवरही प्रसिद्ध करण्यात येतील. या उत्सवात सहभागी झालेला व जाहिरात क्षेत्रात करिअर करण्याच्या ध्येयाने पेटून उठलेला प्रतीक म्हणाला, ‘माझ्यासारख्या कॉलेजात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही फार मोठी संधी आहे. इतक्या मोठ्या संस्थांशी जोडण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. (प्रतिनिधी)