Join us
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार जुंपणार प्रचाराला

By admin | Updated: May 31, 2015 22:58 IST

महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. बहुजन विकास आघाडीनेही नवोदितांना झुकते माप दिले आहे.

दीपक मोहिते, वसईमहानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. बहुजन विकास आघाडीनेही नवोदितांना झुकते माप दिले आहे. अनेक जुन्या व अभ्यासू नगरसेवकांना यंदा संधी नाकारण्यात आली असून हे नगरसेवक आता पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात दिसणार आहेत. बहुजन विकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये २ दिवसांपासून प्रचंड उत्सुकता होती. ती शनिवारी सायंकाळी संपुष्टात आली. अधिकृत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. काही प्रमाणात नाराजी असली तरी निवडणुकीच्या प्रचारात सर्व जण एकदिलाने काम करतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कामाला लागा, असा आदेशच जारी केला आहे. निवडणुकीच्या रिंगणाबाहेर अजीव पाटील, जितेंद्र शहा, विद्यमान महापौर नारायण मानकर, संदेश जाधव, भरत गुप्ता, किरण ठाकूर इ. दिग्गज नगरसेवक असून त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. कोणत्याही पक्षाशी समझोता न करता बहुजन विकास आघाडीने ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच्या सर्व ११५ जागांवर उमेदवार उभे करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. बहुजन विकास आघाडीने निवडणुकीआधीच खाते उघडल्याने विरोधकांमध्ये काही प्रमाणात सन्नाटा पसरला आहे. सोमवार हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून विविध पक्षांचे डमी उमेदवार आपापले अर्ज मागे घेतील. त्यानंतर, लढतीचे चित्रही स्पष्ट होणार आहे. शनिवारच्या छाननीमध्ये सुमारे ३६ उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे आता रिंगणात ७११ उमेदवार आहेत. सुमारे शंभर ते सव्वाशे उमेदवार माघार घेतील, असा अंदाज आहे. उद्या सायंकाळी सर्व उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल व त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. अनेक उमेदवारांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. केवळ १० दिवसांत साडेसहा ते सात हजार मतदारांना भेटण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे. जागावाटपावरून सर्व पक्षांत उद्भवलेला घोळ आता थांबला असून प्रचाराची दिशा व रणनीती आखण्याकरिता सर्वच पक्षांच्या विभागवार बैठका सुरू झाल्या आहेत. पदयात्रा, चौकसभा व मतदारांची प्रत्यक्ष भेट घेणे अशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे. दुसरीकडे १४ जून रोजी होणाऱ्या मतदान व त्यानंतर १६ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने जोरदार तयारी चालविली आहे. या कामाकरिता लागणारा कर्मचारीवर्ग, साहित्य व अन्य कामांचा आढावा निवडणूक शाखेकडून घेण्यात येत आहे.