Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून धडाडणार प्रचारतोफा

By admin | Updated: February 4, 2017 04:28 IST

मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर उमेदवारीसाठी गेला महिनाभर सुरू असलेली धाकधूक आज संपली. आतापर्यंत छुपा प्रचार करणारे उमेदवार पक्षाकडून

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर उमेदवारीसाठी गेला महिनाभर सुरू असलेली धाकधूक आज संपली. आतापर्यंत छुपा प्रचार करणारे उमेदवार पक्षाकडून इशारा मिळताच मैदानात जोमाने उतरले आहेत, तर भ्रमनिरास झालेल्या इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. ही निवडणूक स्वतंत्र लढवत असलेल्या शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे उद्यापासून प्रचाराच्या तोफा धडाडणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या, सभा व भेटीगाठींना वेग येणार आहे. प्रभाग फेररचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले. पाच वर्षे व त्याहून अधिक काळ बांधलेल्या प्रभागाचे फेररचनेत तुकडे झाले. त्यामुळे आपल्यास अनुकूल प्रभाग मिळवण्यासाठी नगरसेवक व इच्छुक राजकीय पदाधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. त्यातच शिवसेना-भाजपाच्या युतीमध्ये घटस्फोट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाल्यामुळे इच्छुकांचे पीकच आले. आतापर्यंत युतीसाठी जागा सोडलेल्या प्रभागातून दावेदारांचा दबाव वाढू लागला. तिकिटांची खात्री नसतानाही अनेक प्रभागांतील इच्छुकांनी यापूर्वीच छुप्या मार्गाने प्रचार सुरू केला होता. हळदी-कुंकू समारंभ, शरीरसौष्ठव स्पर्धा, बेरोजगारांचे मेळावे या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाले. फेररचनेनंतर नव्याने वाट्याला आलेल्या प्रभागाचा अभ्यास सुरू झाला. नव्या प्रभागात आपली डाळ कुठे शिजेल, याचे सर्वेक्षण सुरू झाले. त्यानुसार आपली व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आधीपासूनच इच्छुकांनी सुरू केला होता. (प्रतिनिधी)