Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या उमेदवार यादीचा मुहूर्त लांबणीवर

By admin | Updated: January 24, 2017 23:04 IST

इच्छुकांत ‘चलबिचल’ : भाजपमधील इनकमिंगचा धसका

प्रकाश वराडकर --रत्नागिरी --जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेने आपली यादी जाहीर करण्याचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी आहे आणि उमेदवारी न मिळालेले भाजपमध्ये गेल्यास त्याचा मोठा फटका बसेल, यासाठी शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. मात्र, त्यामुळे आता शिवसेनेतील इच्छुकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी २०१७ रोजी होत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दशकापासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यात अन्य पक्षांना अद्याप यश आले नाही. मात्र, यावेळी राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ होत आहे. शिवसेना वाढतानाच सत्तेसाठी, उमेदवारीसाठी अनेक कार्यकर्त्यांमध्ये महत्त्वाकांक्षाही वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी एकट्या शिवसेनेत तब्बल सव्वाशेपेक्षा अधिक इच्छुक आहेत. त्यात मातब्बरांची संख्याही मोठी आहे.शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी १८ जानेवारीला येथे पत्रकार परिषद घेतली आणि २३ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या ९० टक्के जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, अशी घोषणा केली. मात्र, तो मुहूर्त हुकला आहे. त्यानंतरचा २४ जानेवारीचाही मुहूर्तही हुकला आहे. उमेदवारांची यादी इतर पक्षांच्या आधी जाहीर केल्यास अनेकजण बंडाचे निशाण फडकवतील, असे वातावरण शिवसेनेत निर्माण झाले.‘आम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर बघाच’, असा पवित्रा अनेक इच्छुकांनी घेतला असून, ‘भाजपचे दरवाजे उघडे आहेत’ असा अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चाही रंगली आहे. मात्र, बंडखोरीच्या, पक्षांतराच्या भीतीमुळेच शिवसेनेने यादी जाहीर न करण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.आता यादी जाहीर करण्यासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त सांगितला जात आहे. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री रवींद्र वायकर व खासदार राऊत या दोघांच्या उपस्थितीत यादी जाहीर होणार असल्याचेही सांगितले जात आहे.भाजपच्या जाळ्यात ‘सेने’री मासळी...!गेल्या पंधरा वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. यावेळी सेना मोठा भाऊ, तर भाजप लहान भाऊ अशी प्रतिमाच निर्माण झाली होती. भाजपची ताकदही जिल्ह्यात कमी होती. युती तुटली अन् भाजपने स्वबळाचा नारा दिला. जिल्ह्यात सेनेला घेरण्याचे डावपेच भाजपकडून सातत्याने आखले जात आहेत. केंद्रात व राज्यात असलेल्या सत्तेच्या बळावर यावेळी जिल्हा परिषदेवरील शिवसेनेच्या सत्तेची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी भाजपने सेनेच्या अनेक इच्छुकांसमोर जाळे फेकले आहे. ‘तिकडे’ अन्याय झाला तर आमच्याकडे या, असे आमंत्रणच इच्छुकांना मिळाले आहे. सेनेतील इच्छुकांची गर्दी पाहता भाजपच्या राजकीय पर्ससीन जाळ्यात ‘सेने’री मासळी मोठ्या प्रमाणात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.