मुंबई : येत्या डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रोचे प्रवास भाडे वाढवणार नसल्याची माहिती रिलायन्स व एमएमआरडीएने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली़ त्यामुळे १०, १५ व २० रुपयांत किमान नवीन वर्ष येईपर्यंत तरी प्रवशांना मेट्रोची सफर करता येईल़ मेट्रो सुरू झाल्यानंतर याच्या प्रवास भाडेवाढीचा मुद्दा रिलायन्सने उपस्थित केला़ त्यावर हे प्रवास भाडे निश्चित करण्यासाठी लवाद नेमावा यासाठी एमएमआरडीएने न्यायालयात धाव घेतली़ न्या़ आऱ डी़ धानुका यांच्या खंडपीठाने एमएमआरडीएची मागणी फेटाळली़ त्याविरोधात एमएमआरडीएने मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर अपील याचिका दाखल केली़ त्यावरील सुनावणी न्यायालयाने केंद्र शासनाला हे प्रवास भाडे निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले़ मात्र मंगळवारी झालेल्या सुनावणीत केंद्र शासनाने यासाठी अजून काही दिवसांची मुदत मागितली़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत केंद्र शासनाला दिली़ (प्रतिनिधी)
मेट्रोची भाडेवाढ लांबणीवर
By admin | Updated: September 24, 2014 03:15 IST