आविष्कार देसाई, अलिबागग्रामीण भागातील जनतेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पाणी पुरवठा सनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. पाण्याच्या शुध्दतेचे प्रमाण असलेले सर्वाेच्च चंदेरी कार्ड प्राप्त करण्यात जिल्हा परिषदेला यश आले नसले तरी, हिरवे कार्ड मिळविण्यात यश आले आहे.जिल्ह्यात पावसाळ््यानंतरचे सर्वेक्षण १ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान राबविण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक यांच्यामार्फत सहा हजार तीन जलस्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील ७१४ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड वाटप करण्यात आले आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी आणि कर्जतमधील मोग्रज या दोन ग्रामपंचायतींना तीव्र जोखमीच्या आधारावर लाल कार्ड मिळाले आहे. १०८ ग्रामपंचायतींना मध्यम जोखमीच्या आधारावर पिवळे कार्ड देण्यात आले आहे. या पंचायतींनी सातत्याने स्वच्छतेबाबत जागरुकता न दाखविल्यास त्या डेंजर झोन म्हणजेच लाल कार्डच्या श्रेणीमध्ये जाऊ शकतात. तर स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन केल्यास सेफ झोन म्हणजेच हिरवे कार्ड प्राप्त करू शकतात. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायती, तेथील पाणी समिती, ग्रामस्थ यांनी जलस्रोतांच्या स्वच्छतेबाबत जागरुक राहणे अत्यावश्यक आहे. सर्वेक्षणात ६५६ हिरवे कार्ड, १६२ पिवळे कार्ड आणि ४ ग्रामपंचायतींना लाल कार्डच्या श्रेणीत टाकण्यात आले होते.
शुद्ध जलस्रोतात जिल्ह्याची प्रगती
By admin | Updated: December 25, 2014 22:30 IST