Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरोपाच्या भीतीने प्राध्यापकाची आत्महत्या?

By admin | Updated: April 19, 2015 00:27 IST

घाटकोपरच्या शिवाजी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शुक्रवारी प्राध्यापक विजय बोरे (५७) यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

मुंबई : घाटकोपरच्या शिवाजी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शुक्रवारी प्राध्यापक विजय बोरे (५७) यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी एका महिला प्राध्यापकाने त्यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. त्याच भीतीने त्यांनी ही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना असून, त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.डोंबिवली येथे पत्नीसह राहणारे बोरे हे १९८९ पासून शिवाजी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. शुक्रवारी नेहमीप्रमाणे १२ वाजता ते शाळेमध्ये आले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास काम संपल्यानंतर ते संस्थेच्या वर्कशॉपमध्ये गेले होते. याच ठिकाणी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. काही वेळाने शाळेचा शिपाई या वर्कशॉपमध्ये गेला असता त्याला बोरे हे जखमी अवस्थेत आढळले. त्याने तत्काळ ही माहिती शाळा प्रशासन आणि पंतनगर पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी वर्कशॉपमध्ये पंचनामा केला असता या ठिकाणी पोलिसांना ७.६५ बोअरचा देशी कट्टा, तीन जिवंत काडतुसे आणि बोरे यांनी लिहिलेली सुसाइड नोट सापडली.पोलिसांनी तत्काळ बोरे यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवून तपास सुरू केला. दरम्यान, त्यांनी सुसाइट नोटमध्ये संस्थेशी संबंधित मात्र वैयक्तिक कारणावरून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. आयुष्यभर आपल्याला सर्वांकडूनच अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. त्यातच महिला प्राध्यापकाने छेडछाडीचेही आरोप केल्याने आपण हे आयुष्य संपवत असल्याचे त्यांनी यामध्ये नमूद केले आहे. मृत्यूनंतर बँकेतील रक्कम आणि राहते घर पत्नीच्या नावावर करावे, अशी विनंतीही त्यांनी यात केली आहे. याबाबत पंतनगर पोलिसांनी सध्या तरी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच त्यांनी हा देशी कट्टा कुठून आणला, याबाबत त्यांच्या मित्रांचा आणि शाळेतील सहकाऱ्यांचा पोलिसांनी जवाब नोंदवून घेतला आहे. त्यानंतर आज बोरे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांना सुपुर्द करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर धनावडे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)