Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीवायच्या निकालासाठी प्राध्यापकांचे आदेश

By admin | Updated: June 25, 2017 03:34 IST

मुंबई विद्यापीठाने यंदा मार्च-एप्रिल महिन्यांत घेण्यात आलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासण्यास सुरुवात केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाने यंदा मार्च-एप्रिल महिन्यांत घेण्यात आलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासण्यास सुरुवात केली. पण आॅनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिकांची तपासणी कासवगतीने होत असल्याने जून महिन्याच्या अखेरपर्यंत कोणताही निकाल जाहीर करणे शक्य नाही. त्यामुळे निकाल पुन्हा उशिरा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. हे टाळण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्राचार्यांची बैठक घेऊन प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आॅनलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी केल्यास निकालाला होणारा विलंब टाळता येऊ शकतो. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन करण्यात आली. आॅनलाइन तपासणीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दोनदा प्रक्रिया राबवून त्यानंतर ही तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. जून महिना संपत आला असला तरी अजूनही टीवायच्या निकालाची चाहूल लागलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले आहेत. या कारणामुळे विद्यार्थी संघटना आता आक्रमक होत चालल्या आहेत. निकाल लवकरात लवकर राबवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची घोषणा कुलगुरू यांनी केली आहे. प्राचार्यांच्या बैठकीत निकाल आणि उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या वेळी प्राध्यापकांनी सुटीतही उत्तरपत्रिका तपासणी केली होती. पण, आता प्राध्यापक येत नसल्याने त्यांना पाठवावे, असेही स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.