Join us

प्राध्यापकांची दिवाळीतही हजेरी, मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ : उत्तरपत्रिकांची तपासणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 07:26 IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाने शर्थीचे प्रयत्न करून १९ सप्टेंबरला अखेर ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले, पण या निकालांंमध्ये झालेल्या चुकांचा फटका विद्यापीठाला बसला आहे. अजूनही विद्यापीठाकडे तब्बल ४८ हजार ३६५ पुनर्मूल्यांकनाच्या उत्तरत्रिकांची तपासणी बाकी आहे. त्यामुळे यंदा प्राध्यापकांना सर्व सण-उत्सव विसरून विद्यापीठात हजेरी लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे दिवाळीतही प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.सप्टेंबर महिन्यापर्यंत निकालाचे काम सुरू असल्यामुळे यंदा गणपतीतही प्राध्यापकांना सुट्टी घेता आली नव्हती. आता दिवाळीची सुट्टी सुरू होणार असली, तरीही प्राध्यापकांसमोर उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम आहे. पुनर्मूल्यांकनाचे निकाल विद्यापीठाला लवकर जाहीर करण्याचे आवाहन आहे. त्यामुळे परीक्षा विभाग आता प्राध्यापकांची मनधरणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्राध्यापकांच्या म्हणण्यानुसार, दिवाळी सुट्टीचे प्लॅनिंग आधीच झाले होते. त्यामुळे मुंबईत असलेल्या प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणी करणे शक्य आहे, पण बाहेर जाणाºया प्राध्यापकांनी काय करायचे? असा प्रश्न प्राध्यापक उपस्थित करत आहेत. दिवाळीतही विद्यापीठाचे कामकाज सुरू राहणार आहे. विद्यापीठाने प्राचार्यांशी चर्चा केली आहे. प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी पाठवावे, यासाठी सध्या चर्चा सुरू आहे. अजूनही ४८ हजारांहून अधिक निकाल जाहीर करायचे आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसरे सत्र सुरू होते. यंदा मात्र नाव्हेंबरमध्ये परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे त्याचेही कामकाज प्राध्यापकांना पाहायचे आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ