Join us  

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार प्राध्यापक सुनिल भिरूड यांच्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 4:42 PM

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आज प्रा. सुनिल भिरूड यांच्याकडे सोपविण्यात आला. 

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टीट्यूट माटुंगा येथील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि प्रभारी कुलसचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रो. भिरूड यांच्याकडे आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. प्रा. भिरूड यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार पुढील सहा महिन्यांकरिता किंवा पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत किंवा सरळसेवेने पद भरेपर्यंत यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीपर्यंत असेल.

भिरूड यांनी अभियांत्रिकी शाखेत एम.ई. आणि पीएचडी केली असून त्यांचा २९ वर्षांचा शैक्षणिक आणि ५ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रात त्यांनी एक वर्षांचे महत्वाचे योगदान दिले असून, २०१० ते २०१५ पर्यंत एआयसीटी नवी दिल्ली येथे सल्लागार होते. एआयसीटी मधील ई-गव्हर्नन्स सिस्टम, लीगल सेल, व्हिजिलेंस ऑफिसर आणि डायरेक्टर पब्लिक ग्रीव्हंस सेल या पदावर त्यांनी काम केले आहे. गेल्या वर्षभरापर्यंत प्रभारी कुलसचिव पदाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळल्याबद्दल डॉ. दिनेश कांबळे यांचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठमुंबईशिक्षण