मुंबई - कीर्ती महाविद्यालयात प्रदीर्घकाळ अध्यापन केलेले मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक सुभाष सोमण यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. १९६२ ते १९६५ या काळात कीर्ती महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९६५ पासून १९९८ पर्यंत सलग ३३ वर्षे प्राध्यापक सोमण यांनी अध्यापनाचे काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
अध्यापनाबरोबरच संशोधन आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा भरीव सहभाग होता. सी. डी. देशमुख प्रशासकीय संस्था तसेच राज्य प्रशासकीय मार्गदर्शन संस्था (एसआयएसी) येथे मराठी विषयाचे अध्यापन ते करत असत. भाषा विज्ञान आणि व्याकरण यात सोमण यांचा हातखंडा होता. त्यांचा मार्गदर्शनाखाली ३० संशोधकांनी एम.फिल. तसेच पीएच.डी. पूर्ण केले. रायगड जिल्ह्यातील कोरलाई नावाच्या पोर्तुगीज भाषेचा प्रभाव असलेल्या बोलीभाषेवर त्यांनी संशोधन केले होते.