Join us

दुबईत प्राध्यापक अन् मुंबईत ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कमिशनच्या हव्यासापोटी उच्चशिक्षित तरुणही मादक पदार्थांच्या विक्री व तस्करीत गुंतल्याची बाब अमली पदार्थ नियंत्रण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कमिशनच्या हव्यासापोटी उच्चशिक्षित तरुणही मादक पदार्थांच्या विक्री व तस्करीत गुंतल्याची बाब अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) केलेल्या कारवाईमुळे समोर आली. दुबईत प्राध्यापक असलेल्या आणि मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका कॅमेरुन नागरिकाला अटक करून अमली पदार्थ जप्त केले.

दीबा ओलिवर असे त्याचे नाव असून तो अंधेरीत एमडीएमएच्या एक्सटीसी पिल्स विक्री करीत होता. दुबईमध्ये एका महाविद्यालयात शिकवत असलेला ओलिवर हा कमिशनच्या हव्यासापोटी काही महिन्यांपासून ड्रग्ज पेडलर म्हणून काम करीत होता, अशी माहिती एनसीबीने दिली आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओलिवर हा सुरुवातीला वैद्यकीय उपचारासाठीचा व्हिसा घेऊन भारतात आला होता. त्याला क्षयरोगाचा त्रास असल्याने त्याच्या उपचारासाठी तो मुंबईत आला. या दरम्यान त्याला पैशांची गरज असताना एका ड्रग्ज तस्कराच्या संपर्कात आला. कमिशन मिळू लागल्याने त्याने त्याची विक्री सुरू केली. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने बुधवारी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

ड्रग्जची ऑर्डर मिळाल्यानंतर तो त्याच्या माणसाकडून घेऊन ऑटो किंवा टॅक्सीच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी करायचा. एनसीबीने त्याच्यासह मोहम्मद इमरान अन्सारी नावाच्या एका ड्रग्ज पेडलरला अटक केली आहे. एनसीबी अन्सारीच्या घरी गेल्यानंतर अन्सारीने त्याच्याकडील ड्रग्ज खिडकीतून खाली फेकून दिले. या कारवाईत एनसीबीने अन्सारीच्या घरातून साडेनऊ लाख रुपये जप्त केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

.....................