Join us  

चार युद्धनौकांची माझगाव डॉकमध्ये होणार निर्मिती, आयएनएस निलगिरीचे जलावतरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 6:39 AM

नौदलाच्या ताफ्यातील विमानवाहू युद्धनौका दुरुस्त करण्याची क्षमता आता मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये निर्माण झाली आहे.

मुंबई : नौदलाच्या ताफ्यातील विमानवाहू युद्धनौका दुरुस्त करण्याची क्षमता आता मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये निर्माण झाली आहे. नौदलाच्या मालकीच्या देशातील पहिल्या ड्राय डॉकचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले, तर माझगाव डॉकमध्ये आयएनएस निलगिरीचे जलावतरण करण्यात आले. महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच.सी. अग्रवाल यांच्या उपस्थितीत या वेळी विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. चार युद्धनौकांची माझगाव डॉकमध्ये निर्मिती करण्यात येईल.प्रकल्प १७-ए अंतर्गत ७ युद्धनौकांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ४ युद्धनौकांची निर्मिती माझगाव डॉक येथे करण्यात येईल. प्रकल्पातील पहिल्या युद्धनौकेचे जलावतरण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. याचे वजन २,७३८ टन असून, लांबी १४९ मीटर आहे. शिवालिक श्रेणीची ही युद्धनौका रडारच्या टप्प्यात येत नाही. अत्याधुनिक सेन्सर आणि शस्त्रास्त्रांचा साठा यामध्ये आहे. २ डिझेल आणि २ गॅस टर्बाइनद्वारे या नौकेला इंधन पुरवठा केला जातो. राजनाथ सिंह यांनी सांगितले की, अत्याधुनिक नौका आणि पाणबुडींची रचना तसेच निर्मिती करण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांमध्ये भारताने स्थान मिळवले आहे. भारतीय नौदल आणि माझगाव गोदीचीही सिंह यांनी या वेळी प्रशंसा केली.मुंबईत ड्राय डॉक कार्यान्वित झाल्याने या ठिकाणी विमानवाहू युद्धनौका दुरुस्तीची कामे केली जातील. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील अधिक कडेकोटपणा येईल व यापुढे या कामासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.असे आहे ड्राय डॉकड्राय डॉक २८१ मीटर लांब व ४५ मीटर रुंद आहे. सन २०१० मध्ये या ड्राय डॉकच्या कामाला प्रारंभ झाला होता. हे काम २०१५ ला पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र त्याला विलंब झाला आहे. या ठिकाणी २ छोटी जहाजे पार्किंग करता येतील. यासाठी अतिरिक्त १ किमी लांबीची जागा (बर्थिंग स्पेस) उपलब्ध करण्यात आली आहे. या ड्राय डॉकच्या निर्मितीसाठी १,३२० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एका वेळी एक विमानवाहू युद्धनौका ठेवता येण्याची क्षमता या ड्राय डॉकची आहे. याच्या मध्यावर एक दरवाजा तयार करण्यात आला असून त्याद्वारे दोन वेगवेगळ्या लहान जहाजांची दुरुस्तीदेखील एका वेळी करता येणे शक्य होणार आहे. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी ९० मिनिटे तर पाणी सोडण्यासाठी २ तास ३० मिनिटांचा कालावधी पुरेसा ठरणार आहे.

टॅग्स :भारतीय नौदलमुंबई