Join us
Daily Top 2Weekly Top 5

हेक्टरी २५ क्विंटल भाताचे उत्पादन घेणार

By admin | Updated: May 12, 2015 03:40 IST

यंदाच्या खरीप हंगामामध्ये भाताची सरासरी उत्पादकता प्रति हेक्टरी २५.५० क्विंटल घेण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे.

ठाणे : यंदाच्या खरीप हंगामामध्ये भाताची सरासरी उत्पादकता प्रति हेक्टरी २५.५० क्विंटल घेण्याचा निर्धार कृषी विभागाने केला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बी-बियाणे व खते पुरविण्यात येणार असल्याची माहिती आगामी खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीत कृषी विभागाने दिली.ठाणे जिल्ह्यातील ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामासाठी लागवड करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यापैकी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची व तीन हजार हेक्टरवर नागली, वरीची लागवड होणार आहे. त्यासाठी ११ हजार ६३६ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी आतापर्यंत २४०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना मिळाली आहेत. उर्वरित पुढील आठवड्यापर्यंत उपलब्ध करण्याचा दावा कृषी विभागाने या वेळी केला. यंदाच्या हंगामासाठी राज्य सरकारने ११ हजार ९०० मेट्रीक टन खत मंजूर केले आहे. त्यातील ४३२ मेट्रीक टन खताचा साठा विक्रेत्यांकडे पाठविण्यात आला आहे. बी-बियाणे व खते पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळतील, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महावीर जंगटे यांनी दिली.गावनिहाय जमीन सुपीकता निर्देशांक वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून आतापर्यंत ९८९ गावांपैकी ५०६ गावांचे नमुने घेण्यात आले आहेत. यंदा आणखी २८३ गावांना प्रयोगासाठी निवडण्यात आले आहे. याशिवाय, कृषीच्या यांत्रिकीकरणालाही प्राधान्य देण्याच्या दृष्टीने ४० ते ५० टक्के अनुदानावर यंत्रांचे शेतकऱ्यांना वाटप केले जात आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.येथील नियोजन भवनमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार पडली. या बैठकीला लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, अतिरिक्त अधिकारी रवींद्र पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे उपस्थित होते.