Join us

सर्वसामान्यांसमोर उलगडणार वास्तुसंवर्धनाची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 02:23 IST

अनोखा उपक्रम : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा पुढाकार

मुंबई : बऱ्याचदा संग्रहालयात फेरफटका मारत असताना अनेक वर्षे तेथील कलाकृती तशाच कशा राहतात, हा प्रश्न अनेकांना भेडसावतो. परंतु, त्याचे उत्तर सामान्यांना उलगडत नाही. मात्र आता यापलीकडे जाऊन संग्रहालयातील अमूल्य अशा संग्रहित कलाकृतींचे केले जाणारे संवर्धन आणि जतनाची प्रक्रियाही सामान्यांना जाणून घेता येणार आहे. या प्रक्रियेतील पैलू कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने उलगडले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘संग्रहाचे संवर्धन’ या प्रदर्शनात जतन व संवर्धन केलेल्या काही कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. या कलाकृतींमध्ये शिल्प, चित्र, छायाचित्र, वस्त्र अशा विविध माध्यमांतील कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. ‘संग्रहाचे संवर्धन’ या शीषर्काच्या अंतर्गत संवर्धन कार्यपद्धती उलगडण्यात आली आहे. या प्रदर्शनात सामान्यांकरिता प्रदर्शन दालनात तज्ज्ञ संग्रहक संवर्धन प्रक्रिया, जतन कसे होते हे समजावून सांगत आहेत. याखेरीज, या दालनात दृक्श्राव्य फितीद्वारेही हा विषय मांडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, जतन करण्यापूर्वी कलाकृतीची स्थिती आणि जतन केल्यानंतरची कलाकृती हे दोन्ही पातळ्यांवर दाखविण्यात आले आहे, त्याविषयी माहितीही लिहिण्यात आली आहे.

या अनोख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या प्रदर्शनाविषयी संग्रहालयाचे क्युरेटर ओमकार कडू यांनी सांगितले की, संग्रहालयात संवर्धन आणि जतन हा स्वतंत्र विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून वर्षभर कलाकृतींचे जतन आणि संवर्धन केले जाते. मात्र त्या ठिकाणी सामान्यांना प्रवेश नाही. त्यामुळे ही प्रक्रिया त्यांना ज्ञात नाही. हाच विचार या प्रदर्शनाचा केंद्रबिंदू आहे, त्यातून संकल्पना निर्माण होऊन प्रत्यक्षात साकारले आहे. १५ मेपर्यंत हे प्रदर्शन पर्यटक, अभ्यासकांसाठी खुले आहे.

टॅग्स :इतिहास