जमीर काझी, मुंबईइंडोनेशिया सरकारच्या ताब्यातील छोटा राजन भारतात कधी येईल? हे अद्याप अनिश्चित असले, तरी मुंबई पोलिसांना सध्या भाषेची प्रमुख अडचण भेडसावत आहे. छोटा राजन संबंधीची कागदपत्रे केवळ इंग्रजीतच नव्हे, तर इंडोनेशियन भाषेत भाषांतरित करावी लागणार आहेत. त्यामुळे इंडोनेशियन भाषा अवगत असणाऱ्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू झाला आहे. छोटा राजनला ताब्यात घेण्यासाठी त्या विरुद्धच्या गुन्ह्यांची कागदपत्रे १५ दिवसांत इंडोनेशिया सरकारला सादर करायची आहेत. त्याबाबतची सूचना केंद्रीय गृह विभागाकडून मुंबई पोलिसांना प्राप्त झाली आहे, अन्यथा इंडोनेशिया सरकार छोटा राजनवरील कारवाई केवळ बनावट पासपोर्ट प्रकरणापर्यंतच मर्यादित ठेवण्याची शक्यता आहे.इंडोनेशिया सरकारबरोबर भारताचा गुन्हेगार हस्तांतरण कायदा नसल्याने, त्याची हकालपट्टी (डिर्पोटेशन) करून भारताच्या ताब्यात दिले जाईल, हे निश्चित झाले आहे. त्यासाठी छोटा राजनविरुद्धच्या प्रमुख गुन्ह्यांचा तपशील सादर करायचा आहे. त्या अनुषंगाने क्राइम ब्रँचकडून १९८८ पासून त्याच्याविरुद्धच्या केसेसची माहिती संकलित केली जात आहे. त्याबाबत गुन्ह्यांचे पेपर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंग्रजीत बनविणे सुरू केले होते. मात्र, मंगळवारी केंद्रीय गृह विभाग व सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सर्व पेपर इंडोनेशियन भाषेत बनवून पाठविण्याची सूचना केली. इंडोनेशिया दूतावासाकडून मिळालेल्या सूचनेनुसार त्याबाबतचे आदेश दिल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार, गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी कालपासून इंडोनेशियन भाषा अवगत असलेल्यांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी प्रामुख्याने मुंबईत व अन्यत्र शिकण्यासाठी आलेल्या इंडोनेशियन विद्यार्थ्यांची माहिती घेतली जात आहे. मुंबई विद्यापीठ व अन्य विद्यापीठांच्या परदेशी भाषा विभागांशी संपर्क साधला जात आहे.
कागदपत्रांच्या भाषांतराची अडचण
By admin | Updated: October 29, 2015 00:56 IST