Join us

एसी लोकलच्या चाचणीत अडचणी

By admin | Updated: May 4, 2016 02:34 IST

एसी लोकल मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याची चाचणी अद्यापही सुरू झालेली नाही. या लोकलची उंची-रुंदी ठरावीक मापापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई : एसी लोकल मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याची चाचणी अद्यापही सुरू झालेली नाही. या लोकलची उंची-रुंदी ठरावीक मापापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याची चाचणी घेण्यात अडथळे आहेत. असे असले, तरीही बम्बार्डियर आणि सिमेन्स कंपनीच्या लोकलही याच आकाराच्या असल्याने एसी लोकलची चाचणी घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र आरडीएसओने (रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन) रेल्वे बोर्डाकडे पाठविले आहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात येणारी एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली. या लोकलची चाचणी मे महिन्यातच करण्यासाठी मध्य रेल्वे आग्रही आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले असतानाच, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतही १५ आॅगस्टपासून एसी लोकलची चाचणी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही काहीएक हालचाली होताना दिसत नाहीत. रेल्वेच्या ठरावीक परिमाणांपेक्षा एसी लोकलची उंची आणि रुंदी जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर रेल्वे सुरक्षा आयुक्त आक्षेप घेण्याची चिन्हे असल्याने ते टाळण्यासाठी रेल्वेच्या आरडीएसओने या संदर्भात रेल्वे बोर्डाला पत्र लिहिले आहे. या पत्रात एसी लोकलची उंची व रुंदीबाबतचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाला १८ एप्रिल रोजी पत्र पाठविण्यात आल्यानंतरही अद्याप उत्तर मिळालेले नाही. (प्रतिनिधी)