Join us

घनकच-याची समस्या गंभीर; सूचना फलकाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 24, 2014 23:30 IST

महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रा. पं. हद्दीमध्ये घनकच-याची समस्या दिवसेंदिवस गंभीर

बिरवाडी : महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रा. पं. हद्दीमध्ये घनकच-याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून ग्रा. पं. ने लावलेल्या सूचना फलकाकडे दुर्लक्ष करून ग्रामस्थांनी रस्त्याच्या शेजारीच घनकचऱ्याचा डेपो निर्माण केल्याचे चित्र बिरवाडी परिसरात पहावयास मिळत आहे.याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार गं द. आंबेकर हायस्कूल ते शंकर मंदिर बिरवाडी या रस्त्यालगत सुतार आळी लक्ष्मी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बिरवाडी ग्रा. पं. ने या ठिकाणी कचरा टाकू नये असा फलक लावलेला असताना देखील या ठिकाणी कचऱ्याचा डेपो कायम असल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बिरवाडीचे सरपंच लक्ष्मण पवार यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी घनकचऱ्याच्या समस्येबाबत नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगून बिरवाडी ग्रा. पं. च्या घंटागाडीचा वापर नागरिकांनी नियमितपणे केल्यास उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्याची समस्या दूर होवू शकते असे सांगितले. मात्र नागरिकांनीच घनकचऱ्याच्या समस्येबाबत ग्रा. पं. प्रशासन हतबल असल्याचे बोलून दाखविले.बिरवाडीतील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा ताण ग्रा. पं. प्रशासनावर येत असून मूलभूत सेवा सुविधांवरती त्याचा परिणाम होत असल्याचे सरपंच लक्ष्मण पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र बिरवाडी ग्रा. पं. प्रशासनामार्फत नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा वेळेत न पुरविल्या जात असल्याने घनकचऱ्यासारख्या समस्या उद्भवल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे असल्याचे ऐकावयास मिळत आहे. (वार्ताहर)