पालघर : पालघर तालुक्यातील सातपाटी, मुरबे, नवापूर खाडीत तारापूर औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणार्या प्रदूषित पाण्यामुळे प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने मासे किनार्यावर मृतावस्थेत आढळून येत असून परिसरातील शेतजमिनीही नापीक होत आहेत. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांना नोटीस बजावूनही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. तारापूरच्या महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता अवघी २५ एमएलडी इतकी असून त्याच्या क्षमतेच्या दुप्पट रासायनिक प्रदूषित पाणी या प्रक्रिया केंद्रात येत असल्याने अनेक वेळा या प्रक्रिया केंद्रातून कुठल्याही पध्दतीची प्रक्रिया न करताच ते प्रदूषित पाणी सरळ-सरळ नवापूर, उच्छेळी-दांडी खाडीत सोडले जाते. तेथून मुरबे, सातपाटी खाडीत पसरले जाते. परिणामी खाडीच्या पाण्यातील आॅक्सिजन प्रमाण (सीओडी) कमी होऊन खाडीतील मासे किनार्यावर मृतावस्थेत आढळून येत असतात. तर या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून रासायनिक पाणी वाहून नेणारे काँक्रीटच्या पाईपला तडा गेल्याने लिकेज होत शेतजमिनी नापीक बनल्या आहेत. या प्रदूषणाविरोधात मात्र मोर्चे, आंदोलनाद्वारे प्रदूषण मंडळावर काढले जात आहे. या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय योजनेबाबत महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राजीव कुमार मित्तल यांनी महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाला १७ एप्रिल रोजी नोटीस बजावली आहे. त्या नोटिसीमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कालमर्यादेचे पालन करणारे वेळापत्रक सादर करावे व तोपर्यंत १० लाख रु. बँकेत जमा करावेत. महाराष्टÑ औद्योगिक परिसरात अनधिकृतपणे फिरणारे पाण्याचे टँकर व प्रदूषित कचरा फेकणारे व इतर गोष्टीवर देखरेख ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ ओसीनोग्राफी या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नवापूरच्या खाडीत सोडलेल्या प्रदूषित पाण्याच्या निकृष्ट पाईप लाईन ३१ मार्च २०१५ पर्यंत बदलण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. एमआयडीसी क्षेत्रातील सर्व कुपनलिका सिलबंद कराव्यात. सम्प २ मधून पंपिंग होणार्या पाण्याचे मिटर वा अन्य व्यवस्थेद्वारे मोजणी करावी इत्यादी निर्देश नोटिसीमध्ये देण्यात आले आहेत. प्रदूषण मंडळाकडून वेळोवेळी सूचना करुनही महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाकडून या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावेळी बजावलेल्या नोटिसी संदर्भात अजूनही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नसल्याचे तारापूर प्रदूषण मंडळाचे प्रदूषण अधिकारी संजय भोसले यांनी सांगितले. (वार्ताहर)
प्रदूषणाची समस्या ‘जैसे थे’ !
By admin | Updated: May 15, 2014 00:20 IST