Join us

रसायनांच्या विल्हेवाटीसाठी टँकरचालकांना ‘बक्षिसी’

By admin | Updated: November 30, 2014 22:48 IST

केमिकल कंपन्यांमध्ये तयार झालेले टाकाऊ केमिकल अथवा प्रदूषके यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही कंपनीची असतांनाही कंपनी मालक त्याची विल्हेवाट लावण्यासाठी टँकर चालकांवर विसंबून राहत आहेत

पंकज पाटील, अंबरनाथकेमिकल कंपन्यांमध्ये तयार झालेले टाकाऊ केमिकल अथवा प्रदूषके यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही कंपनीची असतांनाही कंपनी मालक त्याची विल्हेवाट लावण्यासाठी टँकर चालकांवर विसंबून राहत आहेत. पैसे कमाविण्यासाठी हे टॅकर चालक आाणि मालक प्रत्येक टँकरमागे कंपनीकडून पैसे घेऊन त्या प्रदूषकांची परस्पर विल्हेवाट लावत आहेत. त्यातील बहुसंख्य टँकर हे कानसई गावानजीकच्या वालधुनी नाल्यातच केमिकल सोडत आहेत. त्याचे छायाचित्र लोकमतच्या हाती लागले असून या टँकर चालकांकडे चौकशी केल्यास या जीवघेण्या धंद्यात कोण सामिल आहेत याची माहिती मिळणार आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथला जोडणारा पूल, एएमपी गेटजवळील रेल्वे पुल, वडवली येथील नाला, मोरिवली नाला आणि शहाड येथील नाल्यामध्ये अनेक टँकर चालक परस्पर टाकाऊ केमिकल प्रदूषके नाल्यात प्रक्रिया न करताच सोडत आहेत. कंपनीतून बाहेर पडलेल्या केमिकलवर प्रक्रिया करण्यासाठी हजार लिटर्सला ४०० रुपये प्रमाणे खर्च येतो. १० हजार लिटर्स क्षमतेच्या टँकरमधील केमिकलवर प्रक्रिया करण्यासाठी सरासरी ४ हजार रुपये खर्च आणि टँकरमधून वाहतूक करण्यासाठी होणारा खर्च सरासरी ४ हजार रुपये यांचे गणित पाहिल्यास एका टँकरसाठी कंपनीला ८ हजार रुपये खर्च करावा लागतो. मात्र हे पैसे वाचविण्यासाठी अनेक कंपनीनालक हे थेट टँकर मालकाला केमिकल परस्पर नाल्यात सोडून टाकण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये देत आहे.