Join us  

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रियांका भोसले अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 4:38 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सेंट्रल आर्मड् पोलीस फोर्सेस’ परीक्षेत महाराष्ट्राची प्रियांका पितांबर भोसले ही मुलींमध्ये देशात अव्वल आली.

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सेंट्रल आर्मड् पोलीस फोर्सेस’ परीक्षेत महाराष्ट्राची प्रियांका पितांबर भोसले ही मुलींमध्ये देशात अव्वल आली. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आदी संस्थांच्या वरिष्ठ अधिकारी पदांसाठी लोकसेवा आयोगाने परीक्षा घेतली होती.जुलै २०१७ मध्ये लेखी, तर १० मे रोजी मुलाखती घेण्यात आल्या. यात प्रियांका भोसले हिने देशात मुलींमध्ये पहिला, तर जनरलमध्ये ३३ वा क्रमांक पटकावला आहे. एकूण १९० रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेनंतर लोकसेवा आयोगाने १७० यशस्वी विद्यार्थ्यांची शिफारस केली आहे. यात सर्वसाधारण गटातून ८०, ओबीसी ५२, एससी २६ तर एसटी १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या प्रियांका भोसलेने यापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळविले असून मुख्याधिकारीपदी तिची निवड झाली होती. मुंबईतील शासकीय विधि महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण करणाºया प्रियांकाच्या दुहेरी यशाबद्दल विविध स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. तिचे वडील पितांबर भोसले मंत्रालयात महसूल विभागात अपर सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर आई पूनम पवार उच्च न्यायालयात वकिली करतात. भविष्यात नेमके काय बनायचे आहे, हे निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चित यश मिळेल, असे मत प्रियांकाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशानंतर बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :केंद्रीय लोकसेवा आयोगबातम्या