गोंदिया विधानसभा गृह विभागाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गोंदिया मतदारसंघात भाड्याने घेतलेल्या १५६ खासगी वाहनांसाठी तब्बल ३८ लाख ३० हजार रुपये मोजावे लागले आहेत. भाडे बिलाच्या या प्रस्तावाला गृह विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नक्षलग्रस्त भाग असलेल्या गोंदिया मतदारसंघात विशेष सुरक्षा बाळगण्यात आली होती. निवडणूक काम व बंदोबस्तासाठी १५६ खासगी वाहने भाडेतत्वावर घेतली होती. निवडणूक कालावधीत झालेल्या वाहनांच्या वापरापोटी त्यांचे एकूण ३८ लाख ३० हजार १५० रुपये शुल्क झाले होते. गोंदिया पोलीस प्रमुखांनी त्याच्या मंजुरीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत गृह विभागात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.