Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील खासगी बसला मोकळे रान ना मास्क, ना सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:07 IST

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाकडून धावणाऱ्या बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, लांबपल्ल्याच्या खासगी ...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाकडून धावणाऱ्या बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, लांबपल्ल्याच्या खासगी ट्रॅव्हल्स यांना नियम पाळण्याच्या अटीखाली प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबईमार्गे, नागपूर, पुणे, नाशिक, जयपूर ,अहमदाबाद आदी महानगरांकडे जाणाऱ्या व येणाऱ्या ८० ट्रॅव्हल्स सुरू आहेत. त्यात प्रवास करणाऱ्या अनेकांकडून मात्र तोंडाला मास्क लावण्यासह सॅनिटायझरचा वापर केला जात नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिकच तीव्र झाले आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यासह कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांचा आकडाही वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तोंडाला नियमित मास्क लावणे, हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार धुऊन स्वच्छ करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासह इतरही नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियम पाळण्याचे आवाहन केले जात असताना प्रवास करणाऱ्या बहुतांश लोकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

ई-पास नसणाऱ्यांची चाैकशीच नाही

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांजवळ प्रशासनाकडून दिला जाणारा ई-पास बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. चारचाकी वाहने थांबवून पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणीही केली जात आहे. मात्र, ट्रॅव्हल्समधून विना ई-पास प्रवास करणाऱ्यांची चाैकशीही केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

एकाही ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही

मुंबईबाहेर जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. बाहेरील जिल्ह्यातील प्रवाशांची संख्याही जेमतेम असते. बहुतांश ट्रॅव्हल्स रात्रीचा प्रवास करतात. प्रवाशांकडून नियम पाळले जात नसले तरी एकाही ट्रॅव्हल्सवर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

ना मास्क, ना सॅनिटायझर

सध्या गुजरात राजस्थान यासारख्या येथे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या संख्येत घट झाली आहे. पूर्वी ५०० ते ६०० बस जात होत्या हा आकडा आता १५ते १८ वर आला आहे. काही ट्रॅव्हल्समध्ये जाऊन पाहणी केली असता बहुतांश प्रवासी विनामास्क आढळून आले. गर्मीच्या त्रासापासून बचाव व्हावा म्हणून मास्क नाही लावला, असे काही जणांनी सांगितले.

येणाऱ्या ट्रॅव्हल्स ८०

जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ८०

प्रवासी संख्या १६००