Join us  

तामिळनाडूत राहत्या घरातूनच सुरू होता बनावट नोटांचा छापखाना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:43 AM

गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या, नोटा तस्कर गुन्हे शाखेच्या रडारवर

मुंबई : बनावट नोटा छापणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेने धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान तामिळनाडूत राहत्या घरातूनच बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केला.

या कारवाईत छापखान्यातील साधनसामुग्रीसह साडेसात लाख रुपयांच्या पाचशे व दोनशे मूल्य असलेल्या बनावट नोटांचा साठा हस्तगत करण्यात आला. गुन्हे शाखेच्या कक्ष ४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने ३ मार्चला शीव परिसरात सव्वालाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या भास्कर नाडर (४३) याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने या नोटा तामिळनाडूतील तिरुपुथुर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या सर्वनन वनियार(४५) याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. वनियार घरातच या नोटा छापत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, पथकाने घरावर छापा टाकला. तेथे स्कॅनर-प्रिंटर, हिरवट रंगाची प्लास्टीकची वळी, नोटा छापण्यासाठी लागणारे अन्य साहित्य आणि पाचशे, दोनशे रुपये मूल्य असलेल्या सात लाख ५५ हजार किमतीच्या बनावट नोटांचा साठा आढळला. त्यानुसार, वनियारला अटक करण्यात आली.

असा चालायचा छापखानावनियार हा अद्ययावत स्कॅनरद्वारे चलनी नोटा स्कॅन करून त्याची प्रिंट घेत असे. पुढे त्यावर हिरवट रंगाची प्लास्टीकची बारीक पट्टी(नोटेवरील सुरक्षा तंतू) चिकटवे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने अशा प्रकारे लाखो रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या आणि त्या नाडरसारख्या व्यक्तिंद्वारे देशाच्या विविध शहरांमध्ये विक्रीसाठी पाठविल्याची माहिती समोर आली.यापूर्वीच्या कारवायायापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून परतणाºया तरुणाकडून २३ लाखांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली, तर वांद्रे कक्षाच्या अधिकाऱ्यांनी अंधेरीत सुमारे तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या दुकलीला अटक केली.केरळनंतर या टोळीने नवी मुंबईत छापखान्यासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली होती. या टोळीला २०१८ मध्ये केरळ पोलिसांनी अटक केली होती. अटक आरोपींमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री आणि तिच्या आईचाही समावेश होता.या अभिनेत्रीने तिचा बंगला या टोळीला नोटा छापण्यासाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली. केरळच्या टोळीने नोटा छापण्याचे साहित्य नवी मुंबईत आणले होते. तत्पूर्वी अ‍ॅन्टॉप हिल कक्षाने तामिळनाडूच्या टोळीला अटक करून सुमारे नऊ लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या.

टॅग्स :अटक