Join us

सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य पाटील बडतर्फ

By admin | Updated: May 19, 2015 01:45 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित येथील सिद्धार्थ कॉलेजचे निलंबित प्राचार्य डॉ. कृष्णा ए.पाटील यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित येथील सिद्धार्थ कॉलेजचे निलंबित प्राचार्य डॉ. कृष्णा ए.पाटील यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर माझ्या बडतर्फीचा कथित आदेश काढणारे एम.एस.मोरे हेच घोटाळेबाज असून ते सोसायटीचे अध्यक्षच नाहीत, असा दावा पाटील यांनी केला आहे. सोसायटीचे अध्यक्ष आपणच असल्याचे सांगत एम.एस.मोरे यांनी लोकमतला सांगितले की, सोसायटीच्या विश्वस्त मंडळाच्या औरंगाबाद येथे १२ मे रोजी झालेल्या बैठकीत पाटील यांना बडतर्फ करण्याचा निर्णय एकमताने झाला. पाटील यांना ६ जुलै २०१३ रोजी निलंबित करण्यात आले होते. नंतर त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यात आली. त्यात, कॉलेजच्या निधीचा गैरवापर, नियमबाह्य बँक व्यवहार, गैरवर्तन, सेवाशर्र्तींचा भंग, आचारसंहितेचा भंग आदी आरोपांमध्ये ते दोषी आढळले. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. आम्ही पाटील यांना २२ एप्रिल २०१५ रोजी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. मात्र, ती नोटीस त्यांनी न स्वीकारल्याने तशीच परत आली. पाटील यांनी सांगितले की विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष खा.रामदास आठवले असून ते पूर्णत: माझ्या पाठीशी आहेत. मोरे आणि कंपनीचा सोसायटीशी काहीही संबंध नाही. बडतर्फीचा आदेश मी मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पाटील यांच्या बडतर्फीच्या निमित्ताने वर्चस्वाचा वाद पेटण्याची शक्ता आहे.