मनीषा म्हात्रे मुंबई : वयाच्या ४३व्या वर्षी आपल्यापेक्षा कमी वयाच्या आणि सर्वगुणसंपन्न मुलाने विवाहस्थळावरून विचारल्याने तिने स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही दिवस फोनवरून संपर्क सुरूझाला. अशात भेटीचा दिवस ठरला, म्हणून दागिने घालून नटूनथटून ती त्याला भेटली. मात्र, हीच भेट इतकी महागात पडेल, असा विचार तिने स्वप्नातदेखील केला नव्हता. चोरांच्या भीतीने दागिने स्वत:कडे ठेवून हा नवरोबा तिच्या ९ तोळ्यांच्या दागिन्यांसह पसार झाल्याची घटना माटुंगा परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून माटुंगा पोलीस ठगाचा शोध घेत आहेत.वांद्रे पोलीस वसाहतीत ४३ वर्षांची नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसह राहते. विवाह संकेतस्थळावरून तिची ओळख ३५ वर्षांच्या निखिल लेंढेसोबत झाली. निखिल भोईवाडा परिसरात राहतो. आपल्यापेक्षा कमी वयाचा असतानाही निखिलने तिला होकार दिला. तो चांगल्या ठिकाणी नोकरीला असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला. दोघांचेही फेसबुक, व्हॉट्सअॅपवरून संवाद वाढले. तिने घरीही याबाबत कळविले. मुलीचे लग्न जमल्याने कुटुंबीय आनंदात होते.अशात १५ डिसेंबरला दोघांनीही दादरमध्ये भेटण्याचे ठरविले. सकाळी साडे दहाच्या सुमारास भेट झाल्यानंतर फेरफटका मारला. जेवणाचा बेत उरकला. दोघांच्याही लग्नाबाबत गप्पा रंगल्या. अशात दुपारी २च्या सुमारास निखिलने पनवलेमधील काकांनाही भेटून येऊ असे सांगितले. दादर ते पनवेल रिक्षा स्टॅण्डपर्यंत त्याने ओला बुक केली. प्रवासादरम्यान दागिने सुरक्षित राहावेत म्हणून त्याने त्याच्याकडे काढून घेतले. पनवेल रिक्षा स्टॅण्ड परिसरात ओलातून उतरल्यानंतर रिक्षा आणतो असे सांगून गेलेला निखिल परतलाच नाही.कसून तपास सुरू-शोधाशोध करूनही थांगपत्ता न लागल्याने तसेच फोनही बंद असल्याने रात्री १०च्या सुमारास तिने माटुंगा पोलिसांत तक्रार दिली. निखिलचा कसून शोध सुरू असल्याने अधिक माहिती देणे उचित ठरणार नाही, असे माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एम. काकड यांनी सांगितले.
स्वप्नातला राजकुमार निघाला ठकसेन, माटुंग्यातील प्रकार, ९ तोळ्यांचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 03:00 IST