मुंबई : माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत काम बंद आंदोलन केले. शुक्रवारी सायंकाळी रुग्णालय प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार न केल्यामुळे प्रिन्स अली खान कामगार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी कामबंद आंदोलन करण्यात आले.कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करावे, निवृत्तीसाठी ५८ ही वयोमर्यादा करण्यात यावी, सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळावी, कर्मचाऱ्यांना सेवेत बढती मिळावी आणि अशा इतर मागण्यांसाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, रुग्णसेवा ठप्प झाल्याने रुग्णांचेही हाल झाले.कामबंद आंदोलन करणार असल्याचे प्रशासनाला शुक्रवारी रात्री उशिरा कळल्याने अधिकाऱ्यांनी रुग्णांना लवकरात लवकर डिस्चार्ज घेण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्णांच्या हतबल नातेवाईकांनी रात्री-अपरात्री रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात कसे हलविणार याबाबत शंका उपस्थित केली. शिवाय, रुग्णाची तब्येत बिघडल्यास जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणाही प्रशासनाला केली. त्यावर कामगार संघटनेने रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)सोमवारी पुन्हा प्रशासन आणि कामगार संघटनेची बैठक होणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असे प्रिन्स अली खान कामगार संघटनेचे सरचिटणीस किरण लोंढे यांनी सांगितले.
प्रिन्स अली रुग्णालयात गोंधळ
By admin | Updated: December 21, 2014 02:03 IST