मुंबई : स्वस्त धान्याच्या बाबतीत सरकारच्या उदासीनतेचा फटका रेशनिंग दुकानदारांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याच्या निषेधार्थ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी रस्त्यावर उतरले होते. स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनेतर्फे आझाद मैदानात रेशनिंगच्या कोट्यात केलेली कपात व तुटपुंजे कमिशन या प्रमुख कारणांस्तव राज्यातील रेशनिंग दुकानदारांनी धरणे आंदोलन करण्यात आले. प्रल्हाद मोदी हे रेशन दुकानदार संघटनेचे नेते असल्याने त्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.सरकारकडून २०११ च्या जनगणनेनुसार धान्याचा कोटा दिला जातो. प्रत्यक्षात २०११ ते २०१५ या पाच वर्षांत ३० टक्के कार्डधारकांची संख्या वाढली आहे. यासह अनेक रेशनदुकानदारांना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासह अनेक मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनेतर्फे देशव्यापी आंदोलनाचा इशाराही दिला. यासंदर्भात उद्या, मंगळवारी मुंबईत बैठकदेखील होणार आहे. १७ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर महामेळावा होणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले. (प्रतिनिधी)