Join us  

आझाद मैदानात ‘एलजीबीटीक्यू’ची प्राइड परेड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 3:46 AM

मानसिकता बदलण्याची व्यक्त केली गरज

मुंबई : दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘एलजीबीटीक्यू’ची ‘प्राइड परेड’ आयोजित केली जाते. या अभिमान-मिरवणुकीसाठी केवळ इतर शहरांतलेच नाही, तर दूरदूरच्या छोट्या गावांतूनदेखील समलैंगिक एकत्र येतात. शनिवारी आझाद मैदानात ‘हमसफर’ संस्थेने आयोजित केलेल्या ‘प्राइड परेड’मध्ये ‘आम्हालाही सामावून घ्या’ असे संदेश असलेले फलक घेत तरुणाई मोठ्या संख्येने एकवटलेली दिसून आली.

शनिवारी प्राइड परेडमध्येही विविध रंगांचे कपडे परिधान करून विशिष्ट वेशभूषा करीत शेकडोंच्या संख्येत तरुणाई एकत्र आली. यात नागरिकत्व कायद्याचा विरोधही करण्यात आला. याखेरीज, मुख्य प्रवाहात आम्हालाही स्वीकारा, आम्हीही तुमच्यासारखेच सामान्य, असे संदेश देण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयाने २००९ साली कलम ३७७ मध्ये बदल करून समलैंगिकांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आनंदोत्सवाला उधाण आले. त्यानंतर या समुदायाने विविध उपक्रमांतून पुढाकार घेण्याचे ठरविले. याचाच भाग म्हणून दरवर्षी प्राइड परेडचे आयोजन केले जाते.

समाजाची मानसिकता बदलत नाही तोवर केवळ कायदा बदलून काय उपयोग? समाजाने आपल्याला स्वीकारल्याशिवाय आपल्या दैनंदिन आयुष्यात फरक पडायचा नाही अशा विचाराने समाजाची मानसिकता बदलण्यासाठी अनेक योजना ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाने आखल्या. यात ‘हमसफर ट्रस्ट’चा पुढाकार आहे.

या प्राइड परेडमधूनही विविध समाज घटकांतील समलिंगी, द्विलिंगी लैंगिकता असणारे स्त्री-पुरुष, तृतीयपंथी आणि इतर विषमलिंगी लैंगिकतेशिवाय इतर लैंगिकता असणारे आणि त्यांच्या हक्कांना पाठिंबा देणाऱ्या अनेक व्यक्ती, कार्यकर्ते आणि संघटना मिळून ही प्राइड यशस्वीपणे साजरी केली.

टॅग्स :एलजीबीटीमुंबई