Join us  

राजभवनातील भूमिगत संग्रहालयाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 5:15 AM

या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

मुंबई : दोन वर्षांपूर्वी राजभवनात आढळून आलेल्या १५ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण भूमिगत बंकरचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. राजभवनच्या इतिहासासोबतच राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहासही या संग्रहालयात मांडण्यात आला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते रविवारी त्याचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय, राज्यपालांचे निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’ या वास्तूच्या पुनर्बांधणीच्या कोनशिलेचेही राष्ट्रपतींनी अनावरण केले.या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. सन २०१६ मध्ये या राजभवन परिसरातील भूमिगत बंकरचा शोध लागला होता. अनेक दशके बंदिस्त आणि दुर्लक्षित राहिल्याने ही वास्तू स्थापत्य दृष्टीने कमकुवत झाली होती. शिवाय, या बंकरच्या वरच राज्यपालांची ‘जलभूषण’ ही वास्तू असल्याने सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करण्यात आले आहे. स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याला बळकटी देण्यात आली. विविध आकारांचे १३ कक्ष, सुरुवातीला वीस फूट उंच प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रशस्त मार्ग या बंकरमध्ये आहे. बंकरचे संवर्धन करताना त्यातील सर्व मूळ वैशिष्ट्ये जतन केली आहेत. याशिवाय ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ दाखविणारे दालनही निर्माण केले आहे. या वर्षाअखेरपर्यंत संग्रहालय लोकांसाठी खुला करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.या वेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘जलभूषण’च्या पुनर्बांधणीच्या कोनशिलेचेही अनावरण करण्यात आले. तब्बल दोनशे वर्षांपूर्वी सर्वप्रथम येथे तत्कालीन गव्हर्नरसाठी कॉटेज उभारले होते. आधी ब्रिटिश गव्हर्नर व स्वातंत्र्यानंतर राज्यपालांचे निवासस्थान असलेली ही वास्तू अनेकदा बांधली गेली. ही वास्तू निवासासाठी असुरक्षित ठरल्याने तेथे नवी वास्तू उभारली जाणार आहे. नव्या वास्तूमध्ये जुन्या वास्तूमधील ठळक वैशिठ्ये जतन केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.राष्ट्रपती-लता मंगेशकर भेटराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी भारतरत्न लता मंगेशकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. लता मंगेशकर या भारताची शान आहेत. त्यांच्या कर्णमधुर गीतांनी भारतीयांच्या जीवनात माधुर्य निर्माण केले. त्यांची साधी राहणी प्रेरणादायी असल्याचे राष्ट्रपती कोविंद म्हणाले. यावेळी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, कन्या स्वाती कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

टॅग्स :रामनाथ कोविंद