पंकज राऊत ल्ल बोईसरपालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचे क्षेत्र सागरी, डोंगरी, शहरी, निमशहरी व ग्रामीण अशा पद्धतीचे असून काही भागातील समस्या सारख्या आहेत. तर काही भागात त्या वेगवेगळ्या आहेत. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ आॅगस्ट २०१४ रोजी नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर ८ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. विजय सूर्यवंशी यांची सर्वप्रथम नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मागील दहा महिन्यात संपूर्ण पालघर जिल्हा पिंजून काढला. संबंधीतांच्या बैठका घेतल्या प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या व विभागाच्या समस्या व प्रश्न समजून, घेतल्यानंतर येत्या वर्षभरात जिल्ह्याचा निश्चित विकास होऊन येथे ठोस बदल पहावयास मिळेल असा विश्वास त्यांनी पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे तारापूर एमआयडीसी च्या टीमा हॉलमध्ये आयोजित केलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात व्यक्त केला. त्यावेळी पा. जि. प. संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील यांच्यासह संघाचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार उपस्थित होते.डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील विशेष व गंभीर प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे सांगून प्रत्येक विभागाची विस्तृत व परीपूर्ण माहिती देताना प्रथम जिल्ह्यातील ५० टक्के कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत म्हणून दारिद्र्य निर्मूलनाला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तर ग्रामीण भागात भातशेती सोडली तर उत्पन्नाचे दुसरे कुठलेही स्त्र्रोत नसल्याने पुरेशा बेरोजगारीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याचा ग्रामीण भाग म्हणजे कुपोषण, माता व बालमृत्यू ही व्याख्याच बदलण्याचा निर्धार डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त करून कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. ५० टक्के पेक्षा जास्त मुले कुपोषीत आहेत जव्हार भागात ते प्रमाण ६० टक्के इतके आहे. या गंभीर विषयावर नियंत्रण आणण्याकरीता वेगवेगळ्या उपाययोजना लवकरच अमलात आणल्या जाणार आहत. तर कुपोषणाची महत्वाची कारणे कोणती त्याचाही आम्ही सर्व पातळ्यांवर अभ्यास करून कारणांच्या मुळाशी जाऊन कुपोषण ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलणार आहोत.शिक्षण, आरोग्यसेवा, रस्ते, पाणीपुरवठा, ग्रामीण विद्युतीकरण, स्थलांतर, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार, कुपोषण, शाळांचा दर्जा व सोयीसुविधा, दळणवळण, कृषी, साक्षरता, नरेगा कामे, एक कुटूंब एक नोकरी, अॅटो अॅनलायझर, चिरंजीवी योजना, दाई आणि भगताना प्रशिक्षण, मोटार सायकल मेसेंजर, गरोदर मातांचे आरोग्य, लेप्रसी नियंत्रण, हेल्थ एज्युकेशन, विटभट्ट्यावरील कॅप, ई-लर्निंग, गणित चळवळ, इंटरनेट कनेक्टीव्हीटी, ग्रामसंस्कार वाहिनी, ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड कीपींग व कारभारात सुसंगता, स्वच्छ भारत मिशन, अंगणवाडी सुशोभीकरण, तक्रारीला नंबरीग, जिल्हा परिषदेच्या कामात पारदर्शकता, वैयक्तीक लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी, रस्ते बांधणीनंतर क्वालीटी आॅडीट, जि. प. चे निवासी स्पोर्टस स्कूल, पर्यटन इ. सर्व क्षेत्रात विकास, सुसुत्रता आणि नियोजन करून पालघर जिल्ह्याच्या विकासाचे रोल मॉडेल तयार करण्यात येत आहे.