ठाणे : विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली आहे. तसेच मतदानाची तारीखही जवळ आल्याने जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील २३८ उमेदवारांच्या भवितव्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ६१४५ ईव्हीएम (विद्युत मतदान यंत्र) मशीन्स सज्ज ठेवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांच्या तपासणीचे दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ मतदार आणि मतदान केंद्रे वाढल्याने त्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक मतदारसंघांत नवीन मतदारांची संख्या ८९ हजार ३५ ने वाढल्याने मतदारांची एकूण संख्या ५९ लाख ९० हजार ७६७ इतकी झाली आहे. या वाढत्या मतदार संख्येमुळे या १८ मतदारसंघांत १०२ मतदान कें द्रे वाढल्याने त्याच प्रमाणात मशीन वाढवण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण ६,१४५ मतदान केंद्रांत तितक्याच मशीन वाढल्या आहेत. येत्या १५ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रि या पार पडणार आहे. या यंत्रांत काही त्रुटी आहेत का, याची तपासणी करण्यात आली आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. त्या मशीन्स येत्या दोन दिवसांत सज्ज होतील, अशी माहिती निवडणूक यंत्रणेच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
मतदारांसाठी ईव्हीएम मशिन्स सज्ज
By admin | Updated: October 9, 2014 00:18 IST