नवी मुंबई : आदिशक्तीच्या स्वागतासाठी भक्त आणि सार्वजनिक मंडळे देवीचा मंडप, लायटिंग, सजावट, वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करण्यात मग्न झाले आहेत, तर गरबा-दांडिया रसिकांसाठी मैदाने, डिजे, आॅर्केस्ट्रा सज्ज आहे. देवीच्या मूर्तींची रंगरंगोटी पूर्ण झाली असून काही मंडळांनी देवीही कार्यक्रम ठिकाणी आणल्या आहेत. नवी मुंबई शहरामध्ये नवरात्री उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळे आणि घराघरांमध्ये मनोभावे देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. सार्वजनिक मंडळांची जवळपास सर्व तयारी अंतीम टप्प्यात पोहचली आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदिर, रेणूका मातेचे मंदिर त्याशिवाय इतर मंदिरांचे देखावे शहरातील मंडळांनी साकारले जात आहेत. मंडळांनी भव्य रोषणाई केली असून नवी मुंबईतील देवीच्या मंदीरामध्ये नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम आणि जागर, हरिपाठ भजन चालू राहणार आहे.गरबा- दांडिया रसिकांसाठी कार्यक्रम ठिकाणच्या मैदानांची साफसफाई करण्यात आली आहे. एलईडी लाईटींगची सोय आयोजकांनी केली आहे. गर्दीला आकर्षित करण्यासाठी नामवंत गायक, राजकिय नेते, फिल्मसिटीतील स्टार यांची नऊ दिवस वर्दळ राहणार आहे. आॅर्केस्ट्रा आणि भरघोस बक्षीसांचे आमिष आयोजकांकडून गरबा रसिकांना दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेगवेगळे ड्रेस कोड, फॅन्सी ड्रेस स्पर्धाचे आयोजन केले आहे. बुधवारी आमवस्या संपल्यानंतर मोठ्या धुमधडाक्यात देवीचे विधीवत स्वागत करण्यास सुरूवात होणार असल्याचे देवी मुर्तीकारांकडून सांगण्यात आले आहे, तसेच देवीच्या साजश्रुंगाराचे अलंकार व देवीच्या पुजेच्या साहित्य खरेदीची लगबग सुरू आहे. नवदुर्गाच्या स्वागतांसाठी नवी मुंबई शहर सज्ज झाले आहे. (प्रतिनिधी)
नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
By admin | Updated: September 24, 2014 02:32 IST