Join us

गर्भवतींना मिळणार स्वाइन फ्लूची मोफत लस

By admin | Updated: August 1, 2015 04:13 IST

डेंग्यू, मलेरिया यंदा नियत्रंणात असला तरीही स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्भवतींना स्वाईन फ्लूची लागण होऊन धोका उद्भवू नये म्हणून ६ ते ९ महिन्यांच्या गर्भवतींना

मुंबई : डेंग्यू, मलेरिया यंदा नियत्रंणात असला तरीही स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्भवतींना स्वाईन फ्लूची लागण होऊन धोका उद्भवू नये म्हणून ६ ते ९ महिन्यांच्या गर्भवतींना स्वाईन फ्लूची लस कस्तुरबा रुग्णालयात मोफत दिली जाणार आहे. रुग्णालयातील वॉर्ड क्र. १९ मध्ये सकाळी ११ ते ४ या वेळेत लस दिली जाईल. जानेवारी ते मार्च या दरम्यान राज्यासह मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. उन्हाळ््यात स्वाईनच्या रुग्णांत घट झाली होती. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून पुन्हा त्यात वाढ झाली आहे. जुलैमध्ये स्वाईन फ्लूचे १९५ रुग्ण आढळले. गेल्या वर्षातील रुग्णांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण थोडे जास्त आहे. गर्भवतीला स्वाईनची लागण झाल्यास गुंतागुंत वाढून तिच्या गर्भाला धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी ६ ते ९ महिन्यांच्या गर्भवतींना मोफत लस दिली जाणार आहे, अशी माहिती साथरोग नियंत्रण कक्ष प्रमुख डॉ. मिनी खेत्रपाल यांनी दिली. लसीकरणासाठी कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. कस्तुरबा रुग्णालयात मिळणारा प्रतिसाद पाहून प्रभादेवी, भांडुप आणि ओशिवरा येथील प्रसूतीगृहांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तेथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे डॉ. खेत्रपाल यांनी सांगितले.