मुंबई : कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी जानेवारी, २०२१ पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, आतापर्यंत ५७ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगट आणि १८ ते ४४ वयोगट अशा पाच टप्प्यांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले.
मात्र, गर्भवती महिलांना लस देणे सुरक्षित आहे का, याबाबत संभ्रम असल्याने डोस घेण्यासाठी पालिका व सरकारी केंद्रांमध्ये कोणी पुढे आलेले नाही. स्तनदा मातांना लस देण्यास काही महिन्यांपूर्वीच सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ३,३९८ स्तनदा मातांनी लस घेतली आहे, तर लसींच्या सुरक्षाकवचमधून वगळण्यात आलेल्या गर्भवती महिलांनाही आता लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आतापर्यंत लसीकरण - ५७,९३,४८७
पुरुष - ५५ टक्के
महिला - ४४ टक्क्यांपेक्षा कमी
तफावत - दहा टक्के
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी..
- गर्भवती स्त्रियांना कोविड प्रतिबंध लस घेण्याची इच्छा असल्यास, त्यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून लस देण्याबाबत पत्र आणणे गरजेचे आहे.
- त्या गर्भवती महिलेला स्वत:चे संमतीपत्रही द्यावे लागणार आहे. दोन्ही कागदपत्रे लसीकरण केंद्रावर सादर केल्यास लसीकरण केले जाणार आहे.
- गर्भवती महिलांना त्यांच्या डॉक्टरांनी परवानगी दिल्यास लस देण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध केलेली आहे.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)
गर्भवती महिला साधारण कितव्या महिन्यात ही लस घेऊ शकते, लस घेताना तिने काय काळजी घ्यायला हवी, याचे फायदे-तोटे काय, याची माहितीही पालिकेने जाहीर करणे आवश्यक आहे.
- डॉ.माधवी दाते (स्त्रीरोग तज्ज्ञ)