अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिकेतील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिता पाटील यांनी २०११ मध्ये प्रसुतिपूर्व गर्भलिंगनिदान करणाऱ्या १३ डॉक्टरांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या. हे सर्व डॉक्टर महापालिका हद्दीतीलच असून त्या तक्रारींनुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी संबंधितांवर दोषारोपपत्र जाहीर केले आहे. महापालिकेचे अॅड. सचिन कुलकर्णी यांनी ही माहिती लोकमतला दिली.त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून सादर केलेले पुरावे व कागदपत्रांच्या आधारे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला. त्या सर्व केसेसमध्ये संबंधित डॉक्टरांविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल केल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. स्त्रीभ्रूणहत्या होऊ नये आणि त्यावर प्रतिबंध बसावा, यासाठी अत्यंत उत्साहवर्धक असा हा निकाल असल्याची चर्चा महापालिका आरोग्य विभागासह विधी विभागात आहे. नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत समाधान व्यक्त होत असून माहापलिकेच्या कारवाईवर न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने विश्वास वाढीस लागल्याची चर्चा आहे. हा निर्णय न्यायाधीश कादरी तय्यब यांनी दिल्याचेही अॅड. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. संबंधित दोषी डॉक्टरांवर या आदेशान्वये कारवाई होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गर्भलिंगनिदान : १३ दोषारोपपत्रे
By admin | Updated: November 30, 2014 22:56 IST