Join us
Daily Top 2Weekly Top 5

अपारंपरिक विषय आणि भाषा शिकण्यास भारतीय विद्यार्थ्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:06 IST

सर्वेक्षणातील निष्कर्ष : स्रोतांची अनुपलब्धता ठरतेय गैरसोयीचीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय विद्यार्थी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या ...

सर्वेक्षणातील निष्कर्ष : स्रोतांची अनुपलब्धता ठरतेय गैरसोयीची

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय विद्यार्थी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या मुख्य प्रवाहाच्या पलीकडील विषय शिकण्यास पसंती देत आहेत. प्रादेशिक आणि परदेशी भाषा शिकण्यात तसेच मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्रसारखे विषय शिकण्यामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढल्याचे ब्रेनली या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने ई-लर्निंगच्या प्रवाहांचे परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

१,९६३ विद्यार्थी सहभागी असलेल्या सर्वेक्षणातील ४२ % विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांना गणित, विज्ञान आणि इंग्रजीसह त्यांना हव्या असलेल्या विषयांसाठी चांगले स्रोत उपलब्ध आहेत. उलट मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना (५८ %) वाटते की, त्यांच्या आवडीच्या अपारंपरिक विषयांत मदतीसाठी योग्य स्रोत उपलब्ध नाहीत. यात संस्कृत (१२ %), मानसशास्त्र (१० %), राज्यशास्त्र (९ %), तत्त्वज्ञान (६ %) आणि इतर (२० %) आदींचा समावेश आहे. या परिणामांद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि सर्वसमावेशक ऑनलाईन स्रोतांची उपलब्धता यातील फरक अधोरेखित झाला आहे. त्यामुळे या विषयांसाठी ही स्त्रोतांची उपलब्धता आवश्यक असल्याचे मत सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

या सर्वेक्षणात, भारतीय विद्यार्थ्यांनी घरी राहून शिकताना कोणत्या विषयाचा सर्वाधिक आनंद घेतला, हेही शोधण्यात आले. तेव्हा गणित, विज्ञान आणि भाषा (इंग्रजी किंवा इतर) या विषयांना समान २३ % मते दिले गेले. त्यानंतर समाजशास्त्र आणि कॉम्प्युटर/तंत्रज्ञान इत्यादींचा क्रमांक लागतो. दूरस्थ शिकणाऱ्यांनीही प्रत्येकी ११ % मते या विषयांना दिली. घरी राहून शिकताना बहुतांश रिमोट लर्नर्सनी (३३ %) गणितासाठी सर्वाधिक मदत लागल्याचे सांगितले. त्यानंतर विज्ञान (२३ %), इंग्रजी (१७ %), सोशल सायन्स (१३ %) आणि कॉम्प्युटर/ तंत्रज्ञान (९ %) यांचा क्रमांक लागतो. कठीण विषयाचा अभ्यास करताना कोणत्या स्रोताची सर्वाधिक मदत झाली हे विचारले असता, एक तृतीयांश (३३ %) सहभागींनी अभ्यासात मदत करणाऱ्यांमध्ये ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला पसंती दिली. उर्वरित विद्यार्थ्यांनी (३२ %) पुस्तके आणि सर्च इंजिन्स (३० %) या पर्यायांकडून अभ्यास करताना पूरक मदत घेतल्याचे सांगितले. तर ५ % विद्यार्थ्यांनी शिकताना घरच्या शिकवण्या, कोचिंग क्लासेस किंवा स्वअध्ययन आदींची मदत घेतली.

कोविडमुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण निरंतर सुरू आहे, त्यासाठीचे बहुतांश स्रोत ही ऑनलाइनच आहेत. गणित, विज्ञान आणि इंग्रजी या पारंपरिक त्रिकुटापलीकडील विषयांसाठी विश्वसनीय ऑनलाईन सामग्री व स्त्रोतांची उपलब्धता कमी असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, पुरातत्त्व तसेच समकालीन प्रादेशिक भाषा जसे संस्कृत आणि मराठी आदी विषय शिकण्याचीही उत्सुकता असल्याचे ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी यांनी स्पष्ट केले.