Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा जवानांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST

हुतात्मा जवानांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्राधान्य - सामंतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संस्थास्तरीय ...

हुतात्मा जवानांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्राधान्य - सामंत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संस्थास्तरीय कोट्यातील तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या रिक्त जागांवरील संस्था स्तरावर होणाऱ्या प्रवेशांमध्ये दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा पोलिसांच्या पाल्यांना तसेच दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले लष्करी जवान, निमलष्करी जवान यांच्या पाल्यांना प्रतिअभ्यासक्रम जास्तीत जास्त एका जागेवर प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सामंत म्हणाले, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या २००८ सालच्या निर्णयानुसार मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा पोलिसांच्या आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत शिक्षणाची सुविधा प्रदान करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह अन्य शुल्काची प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येते. या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी खासगी विनाअनुदानित संस्थांमध्ये संस्था स्तरावरील जागांमध्ये प्राधान्य देण्याची तरतूद आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या व सीमेवर कार्यरत असताना दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या लष्करी अथवा निमलष्करी दलातील जवानांच्या पाल्यांनाही या निर्णयाचा फायदा होईल. शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये व त्यानंतर होणाऱ्या प्रवेशाकरिता हे नियम लागू असतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

...............................