Join us

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:07 IST

मुंबई ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणीमनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शासनाने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्राधान्याने ...

मुंबई ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शासनाने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्राधान्याने कोविड लस देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस मिळणे आता

आव्हानात्मक झाले आहे. आपल्याला कधी लस मिळेल, या विवंचनेत परदेशी शिकायला जाणारे विद्यार्थी आहेत.

दरवर्षी लाखो विद्यार्थी अमेरिका, युरोप, इंग्लंड, कॅनडा, रशिया आणि अन्य देशांत शिकण्यासाठी जातात. बहुतांश परदेशी विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम हे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सुरू होतात. यंदा भारतीय विद्यार्थ्यांना त्या- त्या देशात पोहोचण्यापूर्वी त्यांनी लस घेतली पाहिजे, अशी अपेक्षा तिकडची विद्यापीठे व्यक्त करत आहेत. जर लस मिळाली नाही, तर प्रवेश मिळूनही लसीअभावी परदेशात जाण्यात अडचण निर्माण होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. शिवाय कोविडच्या काळात परदेशात जाण्यापूर्वी या मुलांचे लसीकरण होणे हे पालकांना सुरक्षित वाटत आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्राधान्याने कोविड लस देण्याची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी ॲड. शिरीष देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

जुलै अखेरपर्यंत या विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्याची व्यवस्था शासनाने लवकर करावी. सध्याच्या कोविड लस प्रक्रियेत अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्गवारी करून परदेशी विद्यापीठांकडून प्रवेश स्वीकारपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रधान्याने लस देण्याची सुविधा नोंदणीप्रक्रियेत असल्यास त्यांना लस घेणे सुकर होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

...........................................................