Join us

ठाण्यात प्रीपेड रिक्षा धावणार?

By admin | Updated: December 15, 2014 23:55 IST

ठाणे स्टेशन परिसरात रिक्षा स्टॅण्ड असून येथे सकाळी व दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास प्रवाशांची गर्दी होती. विशेष म्हणजे याच वेळेस रिक्षांसाठी तासभर रांगा लावाव्या लागत आहेत.

ठाणे : मुंबईत धावणाऱ्या प्रीपेड टॅक्सींच्या धर्तीवर ठाण्यातील रिक्षांनाही तो दर्जा मिळावा म्हणून हालचालींना वेग आला आहे. शहरातही प्रीपेड रिक्षा धावाव्यात, यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही ग्रीन सिग्नल दिला असला तरी यासंदर्भात करण्यात आलेल्या ठरावावर अद्याप स्वाक्षऱ्याच झाल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रीपेडची टुरटुर नव्या वर्षात सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. ठाणे स्टेशन परिसरात रिक्षा स्टॅण्ड असून येथे सकाळी व दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास प्रवाशांची गर्दी होती. विशेष म्हणजे याच वेळेस रिक्षांसाठी तासभर रांगा लावाव्या लागत आहेत. दुसरीकडे अनधिकृतपणे काही रिक्षाचालक या भागात प्रवाशांची लूट करून ठरावीक अंतरासाठी अथवा जवळच्या अंतरासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत आहेत. त्यामुळे येथे प्रीपेड रिक्षा सुरू कराव्यात, यासाठी ठाण्यातील सर्वात जुन्या विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी युनियनने हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार, त्यांनी यासंदर्भात आरटीओकडे प्रस्ताव देऊन त्याचा ठरावदेखील करण्यात आला आहे.या ठरावानुसार स्टेशन परिसरात कोहिनूरच्या जागेत बूथ उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी संगणक, प्रिंटर, स्कॅनर अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच येथे काम करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये कामगारही ठेवले जाणार आहेत. एखाद्या प्रवाशाला प्रीपेड रिक्षाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याने या बूथमध्ये येऊन रिक्षा बुकिंग केल्यावर त्याला ज्या ठिकाणी जायचे असेल, त्या ठिकाणचे भाडे त्याला एका प्रिंटवर दिले जाणार असून, त्यावर त्याचे नाव, रिक्षाचालकाचे नाव, मोबाइल नंबर दिला जाणार आहे. त्यानुसार, त्याला हातात असलेल्या पावतीपेक्षा एकही पैसा जादा द्यावा लागणार नाही, अशी ही सुविधा आहे. यासंदर्भात ठराव झाला असला तरी त्यावर अद्याप आरटीओ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या नसल्याची माहिती मात्र आता समोर आली आहे. यासंदर्भात आता युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केला असून त्यांना अद्यापही या ठरावाची प्रत देण्यात आलेली नाही. तसेच भाडेदराचीदेखील माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या युनियनला व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांच्यापुढेदेखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात विजेसाठी महावितरणकडे पैसे भरण्यात आले असले तरी रस्त्याखालून वीज देण्यासाठी अतिरिक्त पैसे भरावे लागणार असल्याने हे कामही लांबणीवर पडले आहे. आरटीओची रेल्वे अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा होणार होती. तीदेखील अपूर्ण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु आरटीओच्या म्हणन्यानुसार रेल्वे प्रशासनाने आम्हाला सर्वोतोपरी सहकार्य केले असून त्यांनी या कामासाठी एक खास अधिकारी देखील दिला आहे. परंतु एकूणच प्रीपेड रिक्षांचा ठराव आता लांबणीवर पडला असून नव्या वर्षात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.