Join us

कोस्टल रोडसह मान्सूनपूर्व कामांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:07 IST

कोस्टल रोडसह मान्सूनपूर्व कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेमार्फत मुंबईत सुरू ...

कोस्टल रोडसह मान्सूनपूर्व कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेमार्फत मुंबईत सुरू असलेल्या सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) कामाच्या प्रगतीचा राज्याचे पर्यटन आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी मान्सूनपूर्व कामाच्या तयारीचीही त्यांनी माहिती घेतली. पावसाळ्यातही सागरी किनारा मार्गाची कामे नियोजनबद्ध व सुरळीतपणे चालू राहण्याच्या अनुषंगाने कोस्टल रोड टीम तसेच मुंबई महापालिकेच्या सी, डी आणि जी - दक्षिण वॉर्डच्या सहायक आयुक्तांना निर्देश दिले.

ऑनलाइन झालेल्या या बैठकीस संबंधित महापालिका अधिकारी, अतिरिक्त आयुक्‍त (पू.उ.), प्रमुख अभियंता (किरप्र) तसेच सी, डी व जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्‍त उपस्थित होते. या बैठकीत सागरी किनारा मार्ग प्रकल्‍पाची प्रगती व मान्‍सूनपूर्व कामांचा आढावा याबाबत सादरीकरण करण्यात आले. मान्‍सूनपूर्व कामे करण्‍यात येत असून पावसाळ्यात पाण्‍याचा निचरा होण्‍यासाठी पातमुखे, खुला नाला व पंपिंगच्‍या माध्‍यमातून कोठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्‍यात आली आहे. तसेच पावसात चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यान्‍वित करण्‍यात येईल, अशी माहिती देण्यात आली. कामाची प्रगती राखण्‍यासाठी कामगार व इतर साधनसामग्री यांचे योग्‍य नियोजन करावे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.